नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शेतकरी नेत्यांमध्ये दिल्लीत बैठक होत आहे. मात्र, बैठकीच्या ठिकाणाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. तसेच गृहमंत्री निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ही बैठक व्हर्च्युअली होत असल्याची माहितीही मिळत आहे. शेतकरी नेत्यांना पूसा संस्थेच्या आयसीएआर येथील अतिथीगृहाकडे नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अमित शाह घरीच असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
१४ शेतकरी नेते अमित शाहांच्या भेटीला
राकेश टिकैत, गुरुनाम चढुनी, हनन मेला, शिवकुमार कक्का, बलवीर सिंह राजेवाल, जगजीत सिंह, रुलदू सिंह, हरिंद्र सिंह, कुलवंत सिंह संधु, डॉ. दर्शन पाल हे नेते अमित शाह यांची बैठक घेणार आहेत. इतर चार नेत्यांची नावे मिळू शकली नाही. उद्या बुधवारी शेतकऱ्यांची केंद्र सरकारबरोबर चर्चेची सहावी फेरी आहे. त्याआधी अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.
मला अमित शाह यांचा फोन आला होता. त्यांनी आमच्या सोबत बैठक बोलावली आहे. सायंकाळी सात वाजता आम्ही बैठकीसाठी गृहमंत्र्यांकडे जाणार आहोत, असे भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले होते.