धमतरी - छत्तीसगडच्या धमतरी जिल्हा मुख्यालयापासून जवळपास ६५ किलोमीटर अंतरावर सटियारा नावाचं गाव आहे. येथील मंदिरात चक्क वर्तमान पत्राची पूजा केली जातेय. काहींचा विश्वास बसणार नाही मात्र हे खरे आहे. देश स्वतंत्र झाल्याची बातमी वर्तमानपत्रात 15 ऑगस्ट 1947 रोजी प्रसिद्ध झाली होती. मात्र, जवळपास दीड महिन्यानंतर हा पेपर सटियारा गावात पोहोचला. या पेपरातूनच लोकांना समजले की ते ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेत. मग काय स्वातंत्र्याची बातमी घेऊन आलेला हा पेपर गावकऱ्यांसाठी पूजनीयच झाला.
धरणाचे काम आणि चहुबाजूनं पाण्याचा वेढा असलेल्या या गावाला वाहतुकीचे कोणतेही साधन नव्हते. स्वातंत्र्यानंतर तेथे बातमी पोहोचू शकत नव्हती, अशी परिस्थिती होती. यामुळे देश स्वतंत्र झाला तेव्हा सटियारा गावातील लोकांना सुमारे दीड ते दोन महिन्यांपर्यंत देश स्वतंत्र झाल्याची बातमीच मिळाली नव्हती. नावेतून अखेर नवभारत पेपर या गावात पोहचला आणि लोकांना या ऐतिहासिक घटनेची माहिती झाली, असे नवभारतचे उपसंपादक जुनैद रिझवी म्हणाले.
महात्मा गांधीजींचेही एक मंदिर
स्वातंत्र्याचे नायक महात्मा गांधी होते. पेपरात गांधीजींचा फोटो छापून आला होता, त्यामुळं लोकांनी गांधीजींचेही एक मंदिर येथे बांधले. दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला येथे जत्रा भरते. गांधी जयंतीही उत्साहात साजरी केली जाते. त्यासाठी जवळपासच्या गावातून लोक येतात. धरणाच्या कामामुळं येथून विस्थापित झालेल्या लोकांनी गांधी संस्था स्थापन केली असून सर्वजण देवाबरोबरच वर्तमानपत्राचीही पूजा करतात. सटियारा गावातील नव्या पिढीला वयोवृद्ध नागरिक हा वारसा जतन करण्यास आवर्जुन सांगतात. येथील मंदिरात लोक त्यांची गाऱ्हाणी मांडतात. सत्याच्या मार्गावर चालण्याचा आणि चुकीचा मार्ग सोडण्याचा संकल्प करतात.
गंगारेल धरण बांधल्यामुळे गाव पाण्याखाली
गांधीजींचे मंदिर बांधण्यापाठिमागील उद्देश असा होता की, भक्तगण राम, कृष्णासारख्या देवतांची उपासना, सेवा करतात तसेच गांधीजींच्या मंदिरातही त्यांनी सेवा प्रदान करावी. आपले दु:ख, समस्या मांडून चुकीच्या रुढी-परंपरांवर चालण्यापासून रोखले जावे आणि सर्वांना योग्य मार्गावर चालण्याची शक्ती मिळावी, असे गांधी सेवा समितीचे सदस्य कामता प्रसाद साहू म्हणाले. १९४७ साली मंदिर बांधलं गेलं तेव्हा येथे गाव वसलेलेल होतं. मात्र, गंगारेल धरण बांधल्यामुळे गाव पाण्याखाली आले. लोकांना विस्थापित व्हावं लागलं.. येथून दुसरीकडं राहायला गेले असले तरी लोकांची येथील आस्था कमी झालेली नाही. १९९० साली येथे पुन्हा मंदिरांचे बांधकाम करण्यात आलं. येथे दररोज वर्तमान पत्राबरोबरच सत्य आणि अंहिसेचे पालक महात्मा गांधीजींचीही पूजा केली जाते.
..म्हणून आम्ही वर्तमानपत्राची पूजा करतो
आदिवासीबहुल या सटियारा गावात १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला पूजा-पाठाबरोबरच जलसा कार्यक्रम घेतला जातो. विधीवत पूजा करून लोक वर्तमान पत्राची धूप अगरबत्ती ओवाळून आरतीही करतात. त्यानंतर प्रसाद वाटतात. पूजा-अर्चा झाल्यानंतर लोक सामूहिक जेवणाचाही आस्वाद घेतात. येथील लोकांचं म्हणणं आहे की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी आणि वर्तमान पत्रांचं मोठं योगदान आहे. पूर्वी येथे संपूर्ण जंगल आणि नदी होती, त्यामुळे येथे रेडिओ माईकचीही सुविधा नव्हती. सुमारे दोन महिन्यांनंतर, देश स्वतंत्र झाल्याचे लोकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून समजले. म्हणूनच आम्ही वर्तमानपत्राची पूजा करतो, असे स्थानिक युवक लोकेश साहू म्हणाले.
स्वातंत्र्यलढ्यातील योद्धांनी त्यांचा संदेश वर्तमानपत्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचविला. गांधीजींनी हरिजन आणि यंग इंडिया या नावानं वर्तमानपत्रं प्रकाशित केली. स्वातंत्र्यलढ्यात वृत्तपत्रे आणि मासिकांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. सटियारा गावात तर लोकांनी देश स्वतंत्र झाल्याची बातमी छापणाऱ्या पेपराचीच पूजा करण्यास सुरुवात केली.