पणजी (गोवा)- तेहलकाचा माजी संपादक तरुण तेजपाल प्रकरणाचा अंतिम निकाल आता शुक्रवार 21 मे रोजी सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करण्यात आला आहे. न्यायालयात वीज पुरवठ्याची समस्या असल्याने हा निकाल आता सुमारे दोन दिवसांनंतर होणार आहे, असे यासंदर्भात म्हापसा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती शमा जोशी यांनी स्पष्ट केले. कोर्टातील सुनावणीनंतर सरकारी वकील फ्रान्सिस्को टाव्होरा यांनीदेखील हा निकाल बुधवार 21 मे रोजी दिला जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान आजही तेजपाल हा न्यायालयात स्वतः हजार होता.
तब्ब्ल तिसऱ्यावेळीही निकाल तहकूब
आज बुधवारी या प्रकरणी अंतिम निकाल अपेक्षित होता. या अगोदर तेजपाल यांच्या विरोधात म्हापसा येथील न्यायालयात युक्तिवाद पूर्ण झाले होते व त्यावर 12 मे रोजी निकाल जाहीर होणार होता; पण, त्या वेळी तो निकाल बुधवार 19 मे रोजी सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करीत असल्याचे म्हापसा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्यायमूर्ती शमा जोशी यांनी जाहीर केले. आता पुन्हा एकदा हा निकाल शुक्रवार 21 मे रोजी सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करण्यात आला आहे.
थिंक फेस्टिव्हलच्या दरम्यान हे प्रकरण घडले होते
या प्रकरणी तेजपाल याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354 अ व 354ब या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सुमारे सात वर्षांपूर्वी अर्थांत वर्ष 2013 मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते व ते राष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते. तरुण तेजपाल सध्या सशर्त जामिनावर बाहेर आहे.
सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार
तरुण तेजपाल याने एका सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात सादर केल्यानंतर ते प्रकरण अतिशय संवेदनशील तथा गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. काइम ब्रांचच्या तत्कालीन निरीक्षक तथा विद्यमान पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली होती. या खटल्यावरील सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने मागच्या समारे सहा महिन्यांत ती सुनावणी तेजगतीने घेण्यात आली होती.
तरुण तेजपाल याला सहा महिने कोठडीत राहावे लागले होते
बलात्कार झाल्याची तक्रार सादर केल्यानंतर संशयिताला अटक झाली होती व त्याला सुमारे सहा महिने कोठडीत राहावे लागले होते. या खटल्यावरील सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे चार जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. तसेच, अन्य किमान ८० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयिताने जिल्हा व सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. अखेरीस खटल्याची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता.