पुणे - सीरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी लसीकरणासंदर्भात केलेल्या विधानावर स्पष्टीकरण देताना त्यांना कंपनीच्या वतीने अधिकृतपणे बोलण्याची परवानगी नसल्याचे सीरमचे सीईओ अदर पुनावालांनी म्हटले आहे. कंपनीच्या वतीने अशा मुद्द्यांवर ते अधिकृतपणे बोलू शकत नाही. केवळ कंपनीच्या प्रवक्त्यांनाच यावर बोलण्याची परवानगी आहे, असे अदर पुनावालांनी सांगितले आहे. सीरमचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी एका कार्यक्रमात बोलताना सरकारने लसींची उपलब्धता लक्षात न घेता लसीकरण कार्यक्रम सुरू केल्याचे म्हटले होते.
काय म्हणाले होते सुरेश जाधव?
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसकीरणाच्या मोहिमेचा बोजवारा उडाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या तुटवड्यावर आता कोव्हिशिल्ड लस निर्माती कंपनी सीरम इन्स्ट्यूटचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले होते. लशीची उपलब्धता, जागितक आरोग्य संघटनेने दिलेली नियमावली विचारात न घेता केंद्राने विविध वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची घाई केली असल्याचे मत जाधव यांनी व्यक्त केले होते. भारत सरकारला आरोग्य संघटनेने दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यानुसारच लसीकरणाची प्राथमिकता निश्चित करायला हवी. किती डोस उपलब्ध आहेत; किती होतील याचा विचार करुन नियोजन करायला हवं होते. सुरुवातीला ३० कोटी लोकांना लस द्यायची होती. त्यासाठी ६० कोटी लशी लागणार होत्या, ते टारगेट पूर्ण होण्याआधीच ४५ वर्षांवरच्या सर्वांसाठी आणि लगेच १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले केले गेले. तेवढ्या प्रमाणात लस उपलब्ध नाही, हे माहिती असताना, असे निर्णय घेतले गेले, असे जाधव म्हणाले होते.
देशात कोरोना लसीचा तुटवडा -
कोरोना विषाणूची लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे लसीकरणाची मागणी खूप वाढली आहे. अनेक आरोग्य केंद्रावर कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आहे. देशातील लसींची कमतरता आणि वाढती मागणी यात दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी लस पुरवठ्यासाठी जागतिक निविदा मागविण्याचे ठरविले आहे. सुरुवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशात पाठवल्यामुळे देशात लसींची कमतरता जाणवत असल्याची टीका केंद्रावर विरोधीपक्षांकडून केली जात आहे.