हसन (कर्नाटक) – देशभरात कोरोनाचा प्रसार सुरू असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोना नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नागरिक नियमांचे पालन करत आहेत की नाहीत, याचा आढावा पोलीस घेत आहेत. मात्र, यातच पोलिसांनीच नियम धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले. एका पोलीस हेड कॉन्स्टेबलनेच चक्क रेव्ह पार्टी आयोजित केल्याचे वृत्त आहे. ही घटना कर्नाटकातील हसन जिल्ह्यात घडली आहे.
रेव्ह पार्टीसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकत तब्बल 134 लोकांना ताब्यात घेतले आहे. मंगळुरूच्या पांदेश्वर येथील नारकोटिक्स व आर्थिक गुन्हे पोलीस ठाण्याच्या प्रमुख कॉन्स्टेबल श्रीलता यांनी मुलगा अतुल यांच्यासमवेत रेव्ह पार्टी आयोजित केली होती. या ठिकाणावरून पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि अमली पदार्थ जप्त केले. बंगळुरूमध्ये सध्या रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आशावेळी रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्यांनी 'आपत्कालीन सेवा' च्या बहाण्याने हसन शहरात प्रवेश मिळवला होता. बेंगळुरू, मंगळुरु, गोवा आणि इतर ठिकाणच्या लोकांचा पार्टीत समावेश होता.
पोलिसांनी श्रीलता यांना अटक केली आहे. परंतु त्यांचा मुलगा अतुल फरार आहे. तो बेंगळूरुमधील एका संस्थेत नोकरीस आहे. त्याचे ड्रग पेडलर्सशी जवळचे संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या सर्व लोकांची रक्त तपासणी करण्यात आली असून आता पुढील कार्यवाही केली जाईल.
श्रीलता मूळची केरळची आहे. गेल्या चार वर्षांत ती पनंबूर, सुरतकाल आणि बाजपे पोलीस ठाण्यात तैनात होती. यावेळी तिने मंगळुरुमधील अनेक तरुणांशी मैत्री केली होती. पूर्वी अतुलसुद्धा मंगळुरु शहरापासून 18 किमी अंतरावर सुरथकलजवळील कृष्णापुरा येथे आपल्या आईबरोबर राहत होता.
देशातील कोरोनाची परिस्थिती -
महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. कोरोना संसर्गाची वाढते रुग्ण लक्षात घेता कर्नाटक सरकारने शनिवारी रात्रीपासून बंगळूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. मंगळुरुमधील पोलिसांनी शनिवारी रात्रीच्या कर्फ्यूची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत 2,34,692 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे., ही आजपर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय आकडेवारी आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1,45,26,609 वर पोहचली आहे. तर गेल्या शुक्रवारी 2,17,353 आणि गुरुवारी 2,00,739 रुग्णांची नोंद झाली.
हेही वाचा - VIDEO : एकदा बघाच! वर्दीत पोलिसांचा नागीन डान्स, तुफान व्हायरल..