अहमदाबाद Harni Lake Boat Tragedy : गुजरातमधील वडोदरा शहरातील हरणी तलावात बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात 12 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. गुरुवारी घडलेल्या या घटनेनं देशभर शोककळा पसरली आहे. वडोदरा जिल्ह्यातील वाघोडिया इथल्या न्यू सनराईज स्कूलची ही मुलं हरणी तलावावर सहलीसाठी गेल्यानंतर बोटींग करताना ही भीषण घटना घडली. या प्रकरणी आता गुजरात सरकारनं गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश : वडोदऱ्यातील हरणी तलावात घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृह राज्यमंत्री हर्ष संघवी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी करत रुग्णालयात भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मृतांबद्दल शोख व्यक्त करत या घटनेची चौकशीचे आदेश दिले. यावेळी त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं स्पष्ट केलं. बोट उलटल्यानं दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात भादंवि कलम 304, 308 आणि 337 नुसार 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकानं दोन संशयिताना ताब्यात घेतलं आहे.
बोटीत कोंबून भरली मुलं, पालकांचा आरोप : वाघोडिया रोडवरील न्यू सनराईज स्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल हरणी तलाव परिसरात गेल्यानंतर ही घटना घडली. मात्र यावेळी या विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेटशिवाय बोटमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यामुळं मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या तलावात घडलेल्या अपघातानंतर पालकांनी "बोटीत मुलांना लाईफ जॅकेटशिवाय प्रवेश कसा दिला. पैसे कमवण्याच्या हव्यासामुळं मुलांना बोटीत कोंबल्याचा आरोप पालकांनी बोट चालकांवर केला. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त मुलं भरल्यानं हा अपघात झाला. मुलांनी अद्याप गज पाहिलं नाही, त्यांच्यावर काळानं घाला घातला. त्यामुळं या घटनेला जबाबदार असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करावी," अशी मागणी सरकारकडं केली.
हेही वाचा :