Guru Nanak Jayanti 2022 : गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यावेळी कार्तिक पौर्णिमा आज ८ नोव्हेंबरला आहे. गुरु नानक हे शीख समाजाचे पहिले गुरु होते. गुरु नानक यांना त्यांचे अनुयायी बाबा नानक, नानकदेव आणि नानकशाह या नावांनी देखील संबोधतात. गुरू नानक देव यांनी शीख धर्माची पायाभरणी केली होती, त्यामुळे शीख समाजातील लोकांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख समाजातील लोक हा दिवस प्रकाश पर्व ( Prakash Parv ) म्हणून साजरा करतात. जाणून घ्या गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व का म्हणतात.
या दिवसाला प्रकाश पर्व का म्हणतात : गुरु नानक देवजींनी आपले संपूर्ण आयुष्य मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतले. समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या कौटुंबिक जीवनाचा आणि सुखाचाही त्याग केला होता. दूर-दूरचा प्रवास करताना लोकांच्या मनातील दुष्कृत्ये दूर करून लोकांच्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश देण्याचे काम ते करत असत. यामुळेच नानक देवाचे अनुयायी त्यांना त्यांच्या जीवनातील देव आणि मसिहा मानतात आणि त्यांचा जन्मदिवस दिव्यांचा उत्सव म्हणून साजरा करतात.
गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना : दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी प्रकाश पर्व मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. देशभरातील गुरुद्वारांमध्ये अनेक दिवस आधीच तयारी सुरू होते. गुरुद्वारा फुलांनी आणि रोषणाईने सजवले आहेत. सकाळी ‘वाहे गुरु, वाहे गुरु’ असा जयघोष करत प्रभातफेरी काढली जाते. यानंतर गुरुद्वारांमध्ये शब्द कीर्तन केले जाते आणि लोक रुमाला अर्पण करतात. या दिवशी शीख समाजातील लोक दान, मानवसेवा करतात. ते गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना करतात, गुरुवाणीचे पठण करतात आणि कीर्तन करतात. सर्वत्र दिवे लावून रोषणाई केली जाते आणि संध्याकाळी लंगरचे आयोजन केले जाते.
गुरू नानक यांनी देशभर केला प्रवास : गुरू नानक यांचा जन्म 1469 साली पंजाब (Punjab) प्रांतातील तलवंडी या ठिकाणी झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तामध्ये आहे. नानक लहानपणापासूनच आपला वेळ चिंतनात घालवत असत. त्यांनी कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही. नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. पंजाबी, फारशी आणि अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या 11 व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला. गुरू नानक यांनी देशभर प्रवास केला. सन 1521 पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांतील प्रमुख स्थांनांना भेटी दिल्या.
शिख धर्माची स्थापना केली : गुरू नानक हे सर्वेश्वरवादी होते. त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला. देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत अशी त्यांची शिकवण होती. देवाच्या समोर सर्व लोक समान आहेत असं ते म्हणायचे. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ 'गुरू ग्रंथ साहिब'मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. गुरू नानक यांनी आपले संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केले. प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या. याच मूल्यांवर आधारित त्यांनी शिख धर्माची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला.