गुजरात - विजय रुपाणी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरून राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून या पदावर कोणाची निवड करण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रतीक्षा संपली असून आज भूपेंद्र रजनिकांत पटेल यांची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. पटेल हे अहमदाबादच्या घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. विशेष म्हणजे, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत जी नावे होती, त्यात पटेल यांचा समावेश नाही. त्यांच्या निवडीने गुजरातमध्ये पाटीदारांची सत्ता आल्याचे स्पष्टपणे म्हणता येईल. भूपेंद्र पटेल हे गुजरातमधील पाचवे पाटीदार नेता आहेत ज्यांची निवड मुख्यमंत्रिपदासाठी झाली आहे. अलिकडेच केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी देखील भाजप म्हणजे पाटीदार आणि पाटीदार म्हणजे भाजप, असे विधान केले होते.
हेही वाचा - विधानसभा निवडणुकीच्या 15 महिने अगोदर विजय रुपाणी यांची गच्छंती कशामुळे?
भूपेंद्र पटेल यांची भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांचे नाव माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी पुढे केले होते. रुपाणी यांनी शनिवारीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या हा निर्णय अनेकांना आश्चर्यचकित करून गेला. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद जोशी आणि पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत 'हे' मंत्री होते आघाडीवर
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि राज्य कृषिमंत्री आर.सी फालदू, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि मनसुख मांडविय यांबरोबरच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल खोडा पटेल यांचे नावही आघाडीवर होते. मात्र, यांपैकी कुणाची निवड झाली नाही, उलट ज्याचे नावच चर्चेत नाही अशा नेत्याची निवड मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली. त्यामुळे अनेकांचा अंदाज चुकला.
नरेश पटेल यांचे विधान अत्यंत महत्वाचे ठरले
अलिकडेच खोडलधाम ट्रस्टचे चेअरमन नरेश पटेल यांच्या एका वक्तव्याने वाद उभारला होता. नरेश पटेल यांनी, मुख्यमंत्री हा पाटीदार असावा, असे विधान केले होते. आता त्यांच्या विधानाने मूर्त रूप घेतले आहे. भाजपमध्ये पाटीदारांचे वजन आहे. भूपेंद्र पटेल यांना पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे, पाटीदार समाजाला आनंद होईल आणि जे पाटीदार काँग्रेस आणि आम आदमी पक्षात गेले ते परत भाजपमध्ये येण्याची शक्यता बळावली आहे.
पुढील 14 महिने नव्या मुख्यमंत्र्यांसाठी आव्हानात्मक
मुख्यमंत्री झाल्यावर भुपेंद्र पटेल यांच्या पुढील 14 महिने हे महत्वाचे असणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीला फक्त 14 महिने शिल्लक आहेत. निवडणूक डिसेंबर 2022 मध्ये होणार आहे. यात भाजपला विजय मिळवून देण्यासाठी भूपेंद्र पटेल यांना पाटीदारातील दोन्ही कुळ म्हणजेच, कडवा आणि लेउवा पटेल यांची मुठ बांधावी लागेल. काही महत्वाची पावले उचलावी लागेल, जेणेकरून राज्यातील नागरिक भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. त्याचबरोबर, 2022 मधील निवडूक ही भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याने ती आव्हानात्मक ठरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे, त्यामुळे पुढील निवडणूक ही भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.
भूपेंद्र पटेल हे तळागळातून वर आलेले नेते
पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांची पक्षाचे मृदुभाषी कार्यकर्ता अशी ओळख आहे. विशेष म्हणजे, ते तळागळातून वर आलेले नेते आहे. नागरपालिकेपासून त्यांनी राजकारणात प्रवेश करत आज मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांनी 2017 साली पहिल्यांदाच विधानसभा निवडणुक लढवली होती. अहमदाबादच्या घाटलोदिया येथून त्यांनी निवडणूक लढवत 1 लाख 17 हजार विक्रमी मतांच्या फरकाने विजय मिळवला.
प्रेमाने 'दादा' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भूपेंद्र पटेल यांना गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तरप्रदेश राज्याच्या विद्यमान राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे निकटवर्तीय समजले जाते. त्याचबरोबर, ते ज्या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात तो गांधीनगर लोकसभा मतदारसंघ ज्याचे प्रतिनिधित्व केंद्रीय मंत्री अमित शहा करतात त्याचा भाग आहे.
भूपेंद्र पटेल यांनी सन 2015 आणि 2017 दरम्यान अहमदाबाद शहरी विकास प्राधिकरणाचे चेअरमन पद भूषविले आहे. त्यापूर्वी सन 2010 आणि 2015 दरम्यान ते गुजरातमधील सर्वात मोठी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था अहमदाबाद महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. भूपेंद्र पटेल हे त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये हसतमुख आणि तळागळाशी चांगले जुळलेले नेते म्हणून ओळखले जातात.
गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी ते स्थानिक राजकारणातही सक्रिय होते. ते अहमदाबाद जिल्ह्यातील मेमनगर नगरपालिकेचे सदस्य होते आणि त्यांनी दोनवेळा अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ते सरदार धाम विश्व पाटीदार केंद्र, या पाटीदार समाजाच्या सामाजिक - आर्थिक विकासासाठी समर्पित संस्थेचे विश्वस्तही आहेत. त्यांनी सिव्हील इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
राज्यपालांची घेतली भेट
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी निवड झालेले भूपेंद्र पटेल यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेऊन सरकार बनवण्याचा दावा केला आहे. ते उद्या दुपारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
हेही वाचा - मेडिसिन फ्रॉम द स्काय : तेलंगाणात ड्रोनद्वारे दुर्गम भागात औषधं डिलिव्हरीची सेवा सुरू