नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अजेंड्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काँग्रेस, टीएमसी, शिवसेना आणि अकाली दल नेत्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, टीएमसी नेते सुदीप बंद्योपाध्याय, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि अकाली दलाचे बलविंदरसिंग भांडेर यांनी कृषी आंदोलनावरून सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी जेडीयूच्या आरसीपी सिंह यांनी सरकारला पाठिंबा दर्शविला.
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मांडलेल्या प्रस्तावावरच चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. सरकार चर्चेसाठी सदैव तत्पर आहेत. जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा शेतकरी चर्चा करू शकतात. सरकारचा प्रस्ताव अजूनही तसाच आहे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल, असे मोदी म्हणाले. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये फक्त एकाच फोन कॉलचं अंतर आहे, असेही मोदी म्हणाल्याचे संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
लोकतांत्रिक पार्टी प्रमुख हनुमान बेनीवाल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरील सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला. सरकाराने तातडीने शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे बेनीवाल म्हणाले. तथापि, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. 1 फेब्रुवरीला देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.