पु.ल. देशपांडे या नावाशिवाय मराठी साहित्य क्षेत्र पूर्ण होऊ शकत नाही. ‘गुगल आर्ट्स अॅण्ड कल्चर’ या विभागात पु. ल. देशपांडे यांच्या जीवनकार्याचा वेध घेण्यात आला आहे. मुंबईतील समीर कुलावूर यांनी हे डुडल तयार केले असून यात पु.ल. हार्मोनियम वाजवताना दिसत आहेत. तर त्यांच्या मागे विविध रंगांची उधळणही केल्याचेही दिसत आहे.
पु.ल. देशपांडे यांचे मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. त्यांच्या भाषाप्रभुत्वाचे अनेक किस्से आहेत. त्यांच्यावर मराठीत 'भाई' हा चित्रपट बनला आहे. या चित्रपटाचे दोन भाग आहेत. तर 12 जून 2000 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी पुण्यात प्रयाग रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
विलक्षण व्यक्तीमत्त्व -
पुलं हे विलक्षण व्यक्तीमत्त्व होते. त्यांचा हजरजबाबीपणा सर्वश्रृत होता. त्यांची शेकडो भाषणे आणि विनोदी किस्से प्रसिद्ध आहेत. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.