पणजी : कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी यावर्षी शाळांबरोबरच उच्च माध्यमिक अथवा महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत. त्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर 11वी, 12वी, तसेच प्रथम आणि द्वितीय वर्षांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याच्या विचारात गोवा सरकार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केले. हरमल पंचक्रोशी संस्थेच्या गणपत पार्सेकर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सत्कार, म्हणाले मुलगा-मुलगी समान..
या कार्यक्रमाममध्ये गोव्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री असलेले डॉ. सावंत म्हणाले, मुलगा-मुलगी दोन्ही समान आहेत. परंतु, आपल्याला भविष्यात काय साध्य करायचे आहे, याचा निर्णय त्यांना स्वतःला घ्यायचा आहे. ज्यामुळे ज्या विषयाचे ज्ञान घेतल्यानंतर बेरोजगार राहण्याची चिंताच राहणार नाही. यासाठी करीअर काऊन्सलिंगचीही आवश्यकता आहे.
उच्च माध्यमिक शिक्षण धोरणासाठी समिती..
तसेच, केंद्राने ज्याप्रमाणे नवे शैक्षणिक धोरण आणले आहे, त्याप्रमाणेच गोवा सरकारही उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षण धोरण ठरवत आहे. यासाठी समितीही नियुक्त करण्यात आली आहे. राज्य सरकारने अनेक योजना सुरू केलेल्या आहेत. ज्यामुळे शैक्षणिक शुल्क भरता आले नाही म्हणून एखादा विद्यार्थी त्यापासून वंचित राहण्याची समस्या उद्भवणार नाही. तसेच आर्थिक दूर्बल घटकांनाही लाभ कसा पोहचवता येईल याचीही सरकारने तरतूद केली आहे अशी माहिती सावंत यांनी दिली.
या कार्यक्रमामध्ये संस्थेच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 वी आणि 12 वी मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा संस्थाध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पेडणे तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.