गोवा (पणजी) - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोवा राज्याचा दौरा करत कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत शहा यांनी कार्यकर्ते, मंत्री आणि राज्यातील नेत्यांना कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करत आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
शहा यांच्या दौऱ्याने कार्यकर्ते व नेत्यांच्या शिडात निवडणुकीची हवा भरली गेली. यामुळे राज्यातील नेते आता आक्रमक पवित्र्यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले दिसत आहेत. याची काहीशी झलक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भाषणादरम्यान दिसून आली. सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांवर टीका केली. दरम्यान, त्यांनी विधानसभा निवडणुकीत जो अंगावर येईत त्याला शिंगावर घेण्याची भाषा करत एक प्रकारे विरोधकांना चांगलेच आव्हान दिले आहे.
इतर पक्षांची लढाई ही निवडणूक जिंकण्यासाठी
राज्यात भाजपला पूर्ण बहुमत मिळणार असून पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार आहे. मात्र, इतर पक्षांची लढाई ही निवडणूक जिंकण्यासाठी नसून विरोधी पक्षनेते पदासाठी सुरू झाल्याची खोचक टीका महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून काँग्रेस, आप आणि तृणमूल पक्षाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
'ते फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत'
काँग्रेसचे सगळेच नेते स्वतःला मुख्यमंत्री समजत आहेत. मात्र, त्यांच्याकडे पक्षासाठी राज्यात व केंद्रात पूर्णवेळ नेतृत्व नाही त्यामुळे त्या पक्षाची अवस्था ही दिशाहीन झाली आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे. दरम्यान, आम आदमी पक्ष हा खोटा बोलणारा पक्ष आहे. त्यांना आपल्या विजयाची गोव्यात शक्यता वाटत नाही म्हणून फक्त आश्वासनांचा पाऊस ते राज्यात पाडत आहे असही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा - डॉ. सोनारकरांची आरेरावी कायम, वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ