पणजी - देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू आहे. परंतु, या लसीकरण मोहिमेचा वेग वाढवणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दि. 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सर्वांसाठी लाभदायक आहे अशी प्रतिक्रिया गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे यांनी दिली.
केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी हा निर्णय घेतला. या निर्णयाचे स्वागत करताना तानावडे म्हणाले, या निर्णयानंतर गोव्यात 'टीका' उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 10 एप्रिलपासून राज्यात सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजीत राणे लक्ष ठेऊन आहेत. खाटांची उपलब्धता, लसीचा साठा, ऑक्सिजन पुरवठा याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. जितक्या वेगाने लसीकरण होईल, तितक्या प्रमाणात लस घेतलेल्यांची संख्या वाढेल. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल. यासाठी 18 वर्षांवरील सर्वांना लस देणे आवश्यक होते. तो मार्ग आता उपलब्ध झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे गोवा प्रदेश भाजपतर्फे आम्ही स्वागत करतो. असेही तानावडे म्हणाले.