लाहौल-स्पीति (हिमाचल प्रदेश) - शनिवारी चंद्रा खोऱ्यातील गोंधला गावातील समोरच्या पर्वतावरील ग्लेशियर कोसळले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वातावरणात बदल होत असल्याने पर्वतांवरील ग्लेशियर कोसळण्याचा धोका वाढत आहे.
ग्लेशियर कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल -
हिमवर्षावामुळे लाहौल खोऱ्यातील अडचणी वाढल्या आहेत. त्यातच ग्लेशियर कोसळण्याच्या घटनांममध्ये वाढ होत असल्याने लोकांच्या दैनंदिन कामात अडचणी येत असून लोकांमध्ये भितीदेखील वाढत आहे. गोंधला गावात ग्लेशियर कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
प्रशासनाकडून लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन -
स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. लाहौल स्पितीचे आयुक्त पंकज राय यांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे पर्वतांवरून ग्लेशियर कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून प्रवास करावा.
७ फेब्रुवारीला कोसळला हिमकडा -
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ७ फेब्रुवारीला हिमकडा कोसळून नदीला पूर आला होता. या नदीमार्गावर ऋषीगंगा आणि तपोवन या दोन ऊर्जा प्रकल्पांचे काम सुरू होते. अनेक कामगार प्रकल्पाच्या बोगद्यासह विविध भागात काम करत असताना अचानक पुराचा लोंढा आला. यात अनेक कामगार वाहून गेले. तर काही बोगद्यात अडकले. पुरात चिखल, दगड, माती मोठ्या प्रमाणात वाहून आल्याने आपत्तीची भीषणता आणखी वाढली होती. या घटनेत अनेक जणांचे मृतदेह सापडले नाहीत.
हेही वाचा - VIDEO: जो बायडेन विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले