बीरभूम (पश्चिम बंगाल) : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 35 पेक्षा जास्त जागा देऊन नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा, असे आवाहन गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे. ते पश्चिम बंगालच्या बीरभूम येथे बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना शाह म्हणाले की, बंगालच्या जनतेने राज्याच्या निवडणुकीत आम्हाला 77 जागा दिल्या आहेत. ही मोठी जबाबदारी आहे. 2024 मध्ये भाजपला सत्तेत आणा आणि ममता दीदींचे सरकार 2025 पूर्वी पडेल. तृणमूलला सत्तेतून हटवण्यासाठी भाजप हा एकमेव पर्याय आहे, असे देखील शाह यावेळी म्हणाले आहेत.
'गुन्हेगारी थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता द्या' : अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, 'दीदी - भाईपोचे (ममता आणि अभिषेक) गुन्हे थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भाजपला सत्तेवर आणणे. राज्यातील बेकायदेशीर स्थलांतर, गाय तस्करी आणि भ्रष्टाचार केवळ भाजपच थांबवू शकतो. बेनिमाधव हायस्कूलच्या मैदानावर रखरखत्या उन्हात इथल्या गर्दीने बरेच काही बदलणार आहे हे सिद्ध केले आहे', असे शाह यावेळी आक्रमकपणे म्हणाले.
'बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल' : ममता बॅनर्जी सरकार 2026 मध्ये आपला सलग तिसरा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. यावर ते म्हणाले की, 'ममता बॅनर्जी आपल्या पुतण्याला पुढचा मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत, परंतु पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल. फक्त भाजपच भ्रष्ट टीएमसीशी लढू शकते आणि त्यांना पराभूत करू शकते.' ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक हे तृणमुलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार आहेत.
'रामनवमीच्या हिंसेसाठी ममता जबाबदार' : नुकत्याच रामनवमी दरम्यान राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी सरकारला दोषी ठरवत अमित शाह म्हणाले की, 'आमचा पक्ष सत्तेवर आल्यास हावडा आणि रिशरासारखी घटना पुन्हा घडणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, 'रामनवमीच्या दिवशी झालेला हिंसाचार हा ममता बॅनर्जी सरकारच्या तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे घडला आहे. भाजपला सत्तेत आणा आणि पुन्हा रामनवमीच्या रॅलीवर हल्ला करण्याची हिंमत कोणी करणार नाही'.
हेही वाचा : CBI Summonsed Kejriwal: केजरीवाल अडकणार? दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स