हैदराबाद - हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरात सर्व राजकीय पक्षांकडून प्रचार सुरू आहे. आज (शुक्रवार भाजपाच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष जे. पी नड्डा आले असून त्यांनी रोड शोचे आयोजन केले. त्यांच्यासोबत भाजपा नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी आहेत.
अनेक स्टार प्रचारक हैदराबादेत -
याआधी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि स्मृती इराणी यांनी हैदराबादमध्ये येऊन पक्षाचा प्रचार केला. जावडेकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर अनेक आरोप केले. तर स्मृती इराणी यांनीही के. सी. आर सरकारवर हल्लाबोल केला होता.
टीएसआरच्या सत्तेला भाजपाचे आव्हान
मागील निवडणूकीत ९९ जागा जिंकत तेलंगणा राष्ट्र समितीने सत्ता काबीज केली होती. टीआरएस पक्षाचा महापौर होता. मागील निवडणूकीत भाजपाने फक्त चार तर एमआयएम पक्षाने ४४ जागा जिंकल्या होत्या. हैदराबाद महानगपालिकेची निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे अनेक स्टार प्रचारक हैदराबादेत प्रचार करून गेले आहेत. उद्या पंतप्रधान मोदीही हैदराबादच्या दौऱ्यावर येत आहेत. १ डिसेंबरला हैदराबाद महानगपालिकेसाठी निवडणुका होत आहेत.