रुद्रप्रयाग: मुसळधार पावसामुळे केदारघाटातील गौरीकुंड येथे भूस्खलनाची दुर्घटना घडल्यानंतर अद्याप 20 जण बेपत्ता आहेत. तर तिघांचे मृतदेह सापडले आहेत. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांना शोधण्यासाठी त्यांचे नातेवाईक गौरीकुंड येथे पोहोचू लागले आहेत. ज्या लोकांनी भूस्खलनाची घटना पाहिली त्यांनी या दुर्घटनेचा थरार सांगितला. जवाहर सिंह आणि बबलू अशी प्रत्यक्षदर्शींची नावे आहेत. या दोघांनी थरकाप उडवणारी आपबीती सांगितली.
निदान मृतदेह तरी द्या: बेपत्ता झालेले नातेवाईक जिवंत असतील, अशी आशा काही नातेवाईकांनी सोडली आहे. पण त्यांचे शेवटचे दर्शन घेऊन त्यांचे अंत्यविधी करण्यासाठी त्यांचे मृतदेह तरी आम्हाला शोधून द्या अशी मागणी बबलू आणि जवाहर सिंह करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बबलू आणि जवाहर सिंह यांचे नातेवाईक हे गौरीकुंड येथे दुकानदारीचे काम करत असायचे. रस्त्याच्या बाजुला त्यांची दुकाने होती. भूस्खलानाची घटना घडल्यापासून ते बेपत्ता आहेत. अद्याप त्यांच्याविषयी कोणतीच माहिती मिळालेली नाही.
दुकानदारीचे काम करायचे नातेवाईक: बेपत्ता झालेल्या व्यक्तींचे नातेवाईक बचाव आणि मदतकार्यात गुंतले आहेत. या दुर्घटनेत उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारे दोन जण देखील बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले दोघांची गौरीकुंड-सोनप्रयाग या रस्त्यावर दुकाने होती. या दुकानदारीमधून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दरम्यान भूस्खलनाची घटना घडली त्यावेळी बबलू आणि जवाहर सिंह जवळच होते. त्यांच्या डोळ्यादेखत सर्व दुकाने आणि लोक मलब्याखाली दबली गेली आहेत.
काय म्हणाले बबलू आणि जवाहर सिंह: भूस्खलन झाल्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली तीन दुकाने जमीनदोस्त झाली. दुकानातील लोक मलब्यासोबत मंदाकिनी नदीत पडले. ही घटना जेव्हा घडली तेव्हा परिसरात मोठा आरडाओरडा झाला. प्रत्यक्षदर्शी बबलू आणि जवाहर सिंह म्हणाले, की घटना घडल्यानंतर आमच्या भावाला फोनदेखील केला. फोनची रिंग वाजत होती, परंतु कोणीच फोन उचलला नाही. भूस्खलनाची घटना इतक्या वेगाने घडली की, दुकानातील लोकांना तेथून पळून जाण्याची संधीदेखील मिळाली नाही. डोळ्याची पापणी लवेपर्यंत सर्व मातीखाली दबले गेले. घटना घडल्यानंतर लगेच शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु कोणीच सापडले नाहीत. बेपत्ता झालेले आमचे नातेवाईक दोघेही विवाहित आहेत.