फतेहपुर - उत्तर प्रदेशच्या जाफरगंज पोलीस स्टेशन परिसरात सामूहिक बलात्कार पीडितेने मुलाला जन्म दिला. मात्र, आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मुलाला जन्म दिल्यापासून गावकरी पीडितेशी गैरवर्तन करत आहेत. ती गावाबाहेर एका झोपडीत राहत आहे, असे पीडितेच्या बहिणीने सांगितले.
नऊ महिन्यांपूर्वी आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. या प्रकरणात पीडितेने 19 जून 2020 रोजी जाफरगंज पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींना पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतले नाही. पीडितेने सुमारे अडीच महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर गावातील लोक तिच्याशी गैरवर्तन करत आहेत. पीडितेच्या आई-वडिलांचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला असून पीडितेची लहान बहीण तिचा सांभाळ करत आहे.
घटनेपूर्वी बलात्कार पीडित मानसिकदृष्ट्या आजारी होती. उपचारादरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. आरोपींवर कारवाई व्हावी, यासाठी पीडितेला पोलीस ठाण्यात फेऱ्या माराव्या लागत आहेत. परंतू, अद्याप पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. बाळाची डीएनए चाचणी अद्याप बाकी आहे, असे फाउंडेशनच्या संचालक सौम्या सिंह पटेल यांनी सांगितले.