महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाची, गणेश जयंती महाराष्ट्रातील भाविक मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी करतात. यंदा 2023 रोजी जानेवारी महिन्याच्या 25 तारखेला बुधवार रोजी 'श्री गणेश जयंती' (Ganesh Jayanti 2023) आणि 'विनायक चतुर्थी' (Vinayak Chaturthi 2023) असे दोन योग एकाच दिवशी आले आहे. जाणुन घेऊया पुजा, मुहूर्त (Puja and Muhurta) आणि काय आहे गणेश जन्माची (story of Ganesha birth) कथा.
गणेश जयंती 2023: गणेश जयंती हा सण दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो. या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते. असे मानले जाते की, श्रीगणेशाची आराधना केल्याने माणसाचे सर्व दु:ख दूर होतात. गणपतीला अनेक नावांनी ओळखले जाते. त्यांना लंबोदर, गजानन, विघ्नहर्ता इत्यादी म्हणतात. तुम्हालाही गणेशाचा आशीर्वाद घ्यायचा असेल, तर पूजेच्या वेळी श्रीगणेशाच्या जन्माची कथा सांगा. 'श्री गणेश जयंती' आणि 'विनायक चतुर्थी' दोन्ही एकाच दिवशी आल्याने या दिवशी उपवास करुन देवाची आराधना करावी.
गणेश जयंती, चतुर्थी पूजा व शुभ मुहूर्त : गणेश जयंती 24 जानेवारी 2023 रोजी, दुपारी 03:22 ला सुरु होत आहे. तर २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२:३४ ला संपणार आहे. गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:27 ते दुपारी 12:34 पर्यंत म्हणजेच कालावधी - 01 तास 06 मिनिटे असा आहे.
गणेश जन्माची कथा : शिवपुराणात उल्लेखित उपाख्यानानुसार, पार्वतीने एकदिवशी नंदीस द्बारपाल म्हणून नियुक्त करून स्नान करण्यास गेली. यावेळी शंकर तेथे आले. त्यांनी नंदीस झुगारून न्हाणीघरात प्रवेश केला. यामुळे पार्वती अपमानित व रागाने क्षुब्ध झाली. शेवटी सखी जया व विजया यांच्या सल्ल्याने चिखलापासून एका सुंदर पुत्राची मूर्ती निर्मिली व त्यात प्राण फुंकले. या पुत्रास तिने स्वतःचा अनुचर म्हणून नेमले. नंतर एकेदिवशी या कुमार मुलास द्वारपाल नेमून पार्वती स्नानास गेली असता शंकर तेथे उपस्थित झाले. त्यावेळी या कुमाराने शंकरास अडवले. पहिल्यांदा कुमारासोबत त्यांचा वाद व नंतर पार्वतीच्या मनातील इंगिताप्रमाणे युद्ध झाले. शिव व सकल देवतागण या लढाईत पराजित झाले. तेव्हा नारदाच्या सल्ल्याने विष्णूद्वारे कुमारास मोहित करून शंकरांनी त्याचे मुंडके उडवले. ही वार्ता ऐकून पार्वतीने क्रुद्ध होऊन सृष्टी नष्ट करण्यास प्रारंभ केला. नारद व देवगणांनी पार्वतीला शांत केले. तेव्हा पार्वतीने तिच्या पुत्राच्या पुनर्जीवनाची मागणी केली व तिचा पुत्र सगळ्यांना पूज्य व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. शंकरांनी त्यास होकार दिला. परंतु कुमाराचे मस्तक कोठेही न मिळाल्याने त्यांनी गणांस उत्तर दिशेस पाठवले व प्रथम जो प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा केली. गण एका हत्तीचे मस्तक घेऊन उपस्थित झाले. देवगणांनी ह्या मुंडक्याच्या साहाय्याने कुमारास जिवंत केले. तदपरांत शंकरांनी या मुलास स्वपुत्र म्हणून स्वीकारले. देवगणांच्या आशिर्वादाने हा मुलगा पूज्य झाला व गणेश नावाने प्रसिद्ध झाला.