नवी दिल्ली - गतवर्षी जून महिन्यात चिनी सैन्याचा पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सामना करताना भारत मातेचे सुपुत्र कर्नल संतोष बाबू यांच्यासह २० जवानांना वीरमरण आले होते. धारातीर्थी पडण्याआधी चिनी घुसखोरीचा प्रयत्न भातीय जवानांनी हाणून पाडला होता. भारत भूमीच्या रक्षणासाठी जवानांनी दिलेल्या बलिदानाचा प्रजासत्ताक दिनी सन्मान करण्यात आला आहे. कर्नल संतोष बाबू यांनी महावीर चक्र तर इतर पाच जवानांना वीरता चक्र जाहीर करण्यात आले आहे.
पाच इतर जवानांचाही सन्मान -
कर्नल संतोष बाबूंना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर महावीर चक्र जाहीर झाले आहे. तर नायब सुभेदार नुडूराम सोरेन, हवालदार के. पिलानी, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह आणि शिपाई गुरतेज सिंह यांना वीरता पदक जाहीर झाले आहे. तर हुतात्मा मेजर अनुज सूद यांना काश्मीर खोऱ्यातील उत्कृष्ट कामासाठी शौर्य चक्र जाहीर झाले आहे. शत्रूसोबत लढताना केलेल्या शूर कामगिरीसाठी परमवीर हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात येते.
गलवान खोऱ्यात वीर जवानांचा रक्तरंजीत लढा
मागील वर्षी जून महिन्यात चिनी लष्कराने पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारतीय भूभागावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळी चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत तंबू आणि इतर लष्करी साहित्याची जमवाजमव सुरु केली होती. मात्र, कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्त्वाखील भारतीय जवानांनी चीनच्या या कृतीला विरोध केला. चिनी सैन्याबरोबर आधी बाचाबाची झाली. मात्र, नंतर तुंबळ हाणामारी झाली. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला सीमारेषेचे मागे ढकलले. मात्र, यात संतोष बाबू यांच्यासह भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचेही अनेक जवान ठार झाले. मात्र, त्यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर केली नाही. या प्रजासत्ताक दिनी संतोष बाबू आणि त्यांच्या तुकडीतील जवानांच्या वीरतेचा सन्मान करण्यात आला.
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या वीर जवानांना शौर्य पदक देण्यात यावे, अशी शिफारस लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार या प्रजासत्ताक दिनाला जवानांना पदक जाहीर करण्यात आले आहे. युद्धातील कामगिरीसाठी भारताकडून चक्र पुरस्कार देण्यात येतात. यातील परमवीर चक्र हा सर्वोच्च सन्मान आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार महावीर चक्र आहे. तिसऱ्या क्रमांकाचे वीर चक्र हे पदक आहे. तर शांततेच्या काळातील कामासाठी अशोक चक्र, किर्ती चक्र आणि शौर्य चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.