डेहराडून - देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासंदर्भात अनेक नेत्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. यातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी कोरोना हा एक प्राणी असून त्यालाही जगण्याचा अधिकार आहे, असा जावईशोध लावला आहे. यावरून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.
कोरोना विषाणू एक आपल्याप्रमाणेच प्राणी आहे. जसे आपल्यामध्ये जगण्याची इच्छा आहे. तशीच त्याच्यामध्येही आहे. मात्र, आपण सर्व या विषाणूच्या मागे लागलो आहोत. लोकांपासून स्व:ताचा बचाव हा विषाणू आपले रुप बदलत आहे. त्यामुळे आपण त्याच्या एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. जेणेकरून कोरोना विषाणूपासून आपल्या मुक्ती मिळेल, असे विधान त्यांनी केले.
गायीसंदर्भात दावा -
यापूर्वी त्रिवेंद्र सिंह रावत यांनी गायीसंदर्भात एक दावा केला होता. ऑक्सिजन घेऊन ऑक्सिजन सोडणारा गाय हा जगातील एकमेव प्राणी असल्याचं विधान उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं आहे. गायीला काही वेळ गोंजारल्यानं श्वसनाचे आजार बरे होतात, असेही त्यांनी सांगितले होते.
त्रिवेंद्रसिंह रावत यांची गच्छंती -
भाजपाकडून मार्च महिन्यात मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची गच्छंती करण्यात आली होती. त्यानंतर उत्तराखंडची कमान तीरथ सिंह रावत यांच्या हाती सोपवण्यात आली. पक्षाने विचार करून सामूहिकरित्या निर्णय घेत, त्यांना पदावरून हटवले होते. पक्षाचे आमदार रावत यांच्यावर नाराज असल्याचे वृत्त होते.
हेही वाचा - कोरोनापासून बचावासाठी शेणाची अंघोळ टाळा; अघोरी उपायामुळे होऊ शकतो आणखी गंभीर आजार