नवी दिल्ली Exit Polls २०२३ : विधानसभा निवडणूक 2023 च्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या पाचही राज्यांसाठी निकालाचे अंदाज जाहीर करण्यात आले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसंच भाजपाला 36 ते 46 जागा मिळू शकतात. इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत.
छत्तीसगड निवडणूक : 'जन की बात'च्या सर्वेक्षणात भाजपाला 34 ते 45, काँग्रेसला 42 ते 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'चाणक्य'च्या सर्वेक्षणात भाजपाला 33 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच काँग्रेसला 57 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणात काँग्रेसला 41 ते 53, भाजपाला 36 ते 48 इतरांना चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य प्रदेश विधानसभा : 230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपा-काँग्रेस यांच्यात जोरदार लढत झाली आहे. 'जन की बात' सर्वेक्षणानुसार भाजपाला 100 ते 123 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 102 ते 105 जागा मिळू शकतात, तर इतरांना पाच जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'रिपब्लिक'च्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 118 ते 130, काँग्रेसला 97 ते 107 तसंच इतरांना दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. 'पोलस्ट्रॉट'च्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 106 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 111 ते 121 जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना सहा जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिझोरम विधानसभा : 40 जागांच्या मिझोराम विधानसभेत 'जन की बात' सर्वेक्षणात 'एमएनएफ'ला 10 ते 14 जागा, 'झेडपीएम'ला 15 ते 25 जागा, काँग्रेसला पाच ते नऊ, भाजपाला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
तेलंगाणा विधानसभा : 119 जागांच्या तेलंगाणा विधानसभेसाठी गुरुवारी निवडणूक पार पडली. 'जन की बात' सर्वेक्षणात काँग्रेसला 48 ते 64 जागा, बीआरएसला 40 ते 55 जागा, भाजपाला 7 ते 13, 'एआयएमआयएम'ला 4 ते 7 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राजस्थान विधानसभा : 199 जागा असलेल्या राजस्थानबद्दल 'जन की बात' सर्वेक्षणात भाजपाला 100 ते 122 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसंच काँग्रेसला 62 ते 85 जागा मिळू शकतात. 14 ते 15 जागा इतरांच्या खात्यात जातील, असा अंदाज आहे. 'पोलस्ट्रॉट'च्या सर्वेक्षणानुसार भाजपाला 100 ते 110, काँग्रेसला 90 ते 100 आणि इतरांना 5 ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. 'अॅक्सिस माय इंडिया'च्या सर्वेक्षणात काँग्रेसला 86 ते 106 जागा, भाजपाला 80 ते 100, इतरांना 9 ते 18 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निकाल रविवारी : पाच राज्यांमध्ये 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान मतदान झालं. पाचही विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपा- काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे. तर तेलंगाणात दोन्ही राजकीय पक्ष आणि भारत राष्ट्र समिती (BRS) सोबत तिरंगी लढत आहे. मिझो नॅशनल फ्रंट (MNF) हा मिझोराममधील प्रमुख राजकीय पक्षांपैकी एक आहे.
सध्याची काय आहे स्थिती : समाजवादी पार्टी (SP), बहुजन समाज पार्टी (BSP), आम आदमी पार्टी (AAP), ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) सारखे इतर राजकीय पक्षांनी या राज्यांमध्ये निवडणुकीत सहभाग घेतला होता. सध्या राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशात भाजपाची सत्ता आहे. MNF चे झोरामथांगा हे मिझोरामचे मुख्यमंत्री आहेत. तसंच BRS चे के चंद्रशेखर राव यांची तेलंगणात सत्ता आहे.
सर्वांचाच विजयाचा दावा : सर्वच पक्षांनी निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला (भाजपा) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 'अभूतपूर्व यश' मिळणार आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे.
हेही वाचा -