दंतेवाडा (छत्तीसगड) - देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अशा कठीण काळात फ्रंटलाईन वॉरियर्स आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा बजावत आहेत. यादरम्यान, पाच महिन्याची गर्भवती पोलीस उप-अधिक्षकही या लढ्यात रस्त्यावर उतरली आहे.
दंतेश्वरी महिला कमांडोच्या उपअधिक्षक शिल्पा साहू या पाच महिन्यांच्या गर्भवती आहेत. पण त्या आपली जबाबदारी ओळखून रस्त्यावर उतरल्या आहेत. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना त्या घरीच राहण्याचा सल्ला देत आहेत.
दंतेवाडा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने लॉकडाऊन लावला आहे. पण काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत आहेत. या नागरिकांचा बंदोबस्त करण्यासाठी शिल्पा साहू या रस्त्यावर उतरल्या आहेत. त्या विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या तसेच विना मास्क भटकणाऱ्यांवर कारवाई करत आहेत. शिल्पा यांनी सांगितलं की, 'तुम्ही सुरक्षित राहाव, यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत.'
शिल्पा साहू पुढे म्हणाल्या, 'मी गर्भवती असताना देखील रस्त्यावर उतरले आहे. याच कारण लोकांना कळावं की, सुरक्षेसाठी पोलीस किती प्रयत्न करत आहेत. नागरिकांचं कर्तव्य आहे की, ते आपल्या कुटुंबियांसह घरीच राहावे, सुरक्षित राहावे.'
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बस्तर संभाग परिसरातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेतला. या दरम्यान, त्यांनी शिल्पा साहू यांच्या कार्याचे कौतूक केले. त्यांनी, शिल्पा साहू यांनी आपल्या कर्तव्याबाबत समाजात एक आदर्श उदाहरण ठेवलं असल्याचं म्हटलं आहे.
हेही वाचा - आता 18 वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस, 'या' तारखेपासून होणार लसीकरणास सुरुवात
हेही वाचा - केंद्र सरकारच्या निर्णयाचे गोवा प्रदेश भाजपतर्फे स्वागत