चंदीगड - हरयाणामध्ये एका कुस्ती केंद्रात गोळीबार झाला असून यात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रोहतक जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रोहतक शहरातील एका खासगी महाविद्यालयाशेजारी असलेल्या कुस्ती केंद्रात ही गोळीबाराची घटना घडली. जुन्या वादातून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गोळाबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. सर्व मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनास पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.