पणजी (गोवा) - पणजी शहराजवळच्या काकरा गावातील संतोष गाऊसो हा भारतातील एकमेव मच्छिमार असेल, कि जेव्हा तौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडकणार असा इशारा हवामान खाते देत असताना तो अजिबात चिंतेत नव्हता. त्याच्याकडे या वादळात गमावण्यासारखे काहीच नव्हते. तो गेली दोन वर्ष या भागात झालेल्या एका वादळाचा सरकार दप्तरी शोध घेत आहे. त्याची हरलेली लढाई आजही त्याने जमेल तशी सुरु ठेवली आहे.
काकरा गावात 25 जुलै, 2019 रोजी झाले होते वादळ -
25 जुलै, 2019 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वारे वाहू लागले. पणजी शहराजवळच्या काकरा आणि अन्य एका गावाला या वादळी वाऱ्यांचा जोरदार फटका बसतो. या वादळात संतोष गाऊसो यांचे माड कोसळतात. त्यात त्याच्या मच्छिमारीसाठी वापरात असलेल्या होड्या फुटून जातात. काकरा गावातील मच्छिमार संजय परेरा मच्छिमारीवर स्वतःचे कुटुंब चालवणारा संतोष गाऊसो यांची व्यथा सांगत होता. या वादळात त्याला इतका मोठा फटका बसतो कि, त्याच्या उदरनिर्वाहाची सर्वच साधने उध्वस्थ होतात. आज त्याला दुसऱ्याची होडी भाड्याने घेऊन स्वतःचा मच्छिमारी व्यवसाय चालवावा लागत आहे.
मच्छिमाराची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लढाई मत्स्य विभागाला हवीय हवामान खात्याकडे वादळ झाल्याची नोंद -यानंतर संतोष आपल्या नुकसान भरपाईसाठी मत्स्य विभागाकडे जातो. त्यांना आपल्या नुकसानीची माहिती देतो. नुकसानीचे फोटो सादर करतो. मात्र त्याला या भागात वादळ झालंच नाही तर नुकसानभरपाई कसली ? असा उलट प्रश्न विचारला जातो. हवामान खात्याकडे वादळ झाल्याची नोंद आणि नुकसानीची पंचयादी त्यासोबत पोलिसातील एफआयआर मागितली जाते. संतोष पुढे म्हणतो मी हवामान खात्याकडेही गेलो मात्र त्यांच्याकडेही वादळाची नोंद नाही. किंबहुना या वादळाचा इशाराही या खात्याने दिलेला नाही. मत्स्य विभाग याच नियमावर अडून बसला आहे. या वादळाचे प्रत्यक्षदर्शी पुरावे संतोषकडे आहेत. मात्र मत्स्य विभागाला शासकीय नोंदी हव्या आहेत. त्या मिळत नसल्यामुळे संतोषचा प्रस्ताव मत्स्य विभागाने फेटाळला आहे, असे संतोष सांगतो. "त्यात" त्यांच्या नुकसानभरपाईचे प्रकरण अडकले आहे - संतोषला या लढाईत त्याचा मित्र संजय परेरा त्याला मत्स्य विभागाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत करत आहे. परंतु तोही काही करू शकत नाही. संजय परेरा सांगतो मत्स्यव्यवसाय विभागाने एक सर्वेक्षण केले होते, ज्यात संतोष गाऊसो याच्या नुकसानीची नोंद घेतली गेलेली आहे. परंतु मत्स्य विभागाला पोलिस एफआयआर आणि हवामान खात्याचा इशारा हवा असल्याने त्यात त्याच्या नुकसानभरपाईचे प्रकरण अडकले आहे. याबाबत आम्ही आमदार, मुख्यमंत्री यांचेही लक्ष वेधले आहे. परंतु त्यांच्याकडूनही संतोषला काही न्याय मिळाला नसल्याचे संजय परेरा याने सांगितले.
होडीचे भाडे देण्यासाठी त्याची कमाई जाते -
दरम्यान संतोषने आता आपल्याला हि लढाई जिंकता येईल, याची आशा सोडली आहे. संजय परेरा सांगतो कि, त्याला वाटते, की मत्स्यव्यवसाय विभागाने त्याला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांच्या कॉर्पस फंडाचा उपयोग करावा. मात्र कागदावरील नियमांमुळे ते होत नाही. सध्या स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याने भाड्याने घेतलेल्या होडीचे भाडे देण्यासाठी त्याची कमाई जाते. यामुळे त्याचे आयुष्य अत्यंत दयनीय बनले आहे.