नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात राजधानी दिल्लीत सुरू असेलल्या शेतकरी आंदोलनाला आता अडीच महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही तोडगा निघाला नाही. दरम्यान, शेतकरी आंदोलकांनी १८ फेब्रुवारीला देशव्यापी 'रेल रोको' आंदोलनाची घोषणा दिली आहे. देशभरात या दिवशी चार तास रेल्वे गाड्या अडवण्यात येणार आहेत. तसेच १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 'कँडल मार्च' काढण्यात येणार आहे.
संयुक्त किसान मोर्चाकडून अधिकृत वक्तव्य जारी -
१८ तारखेला दुपारी १२ ते ४ या वेळात रेल रोको करण्यात येणार आहे. संयुक्त किसान मोर्चाने याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले आहे. आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी आंदोलकांनी आठवडाभराची रणनिती आखली आहे. १२ फेब्रुवारीपासून राजस्थानात टोल वसूली करू देणार नाही, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम -
या महिन्याच्या सुरुवातील शेतकऱ्यांनी रास्ता रोकोची हाक दिली होती. तीन तास रस्त्यावर देशातील विविध आंदोलन करण्यात आले होते. केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. गांधी जयंती म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत दिल्लीतील आंदोलन सुरू राहील असा पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतला आहे. दिल्लीच्या सिंघू, टीकरी आणि गाझीपूर सीमेवर हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत.