नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर काहीच तोडगा निघालेला नाही. आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकरी आंदोलनावर लवकरच उपाय निघाणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नरेंद्र सिंह तोमर आज रविवारी सकाळी ग्वाल्हेरला पोहोचले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासमवेत ते स्थानिक कार्यक्रमांना उपस्थित राहतील.
काँग्रेसला शेतकरी आंदोलनावर बोलण्याचा अधिकार नाही. कारण, काँग्रेसने 2019 च्या घोषणा पत्रामध्ये कृषी सुधारणांचा स्पष्ट उल्लेख केला होता. आता काँग्रेस कृषी कायद्यांचा विरोध करत आहे. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही. काँग्रेस फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याच काम करत आहे, असे ते म्हणाले. सरकार आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असून लवकरच त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्यांवर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी टीका केली. ते कृषी मंत्री आहेत. मात्र, त्यानी कधीच शेती केलेली नाही. काँग्रेसच त्यांना गांभीर्याने घेत नाही. तेव्हा त्यांच्या वक्तव्यांचा गांभीर्याने विचार केला जाऊ नये, असे तोमर म्हणाले.
शेतकरी आंदोलन -
प्रजास्ताक दिनी ट्रॅक्टर परेडला गालबोट लागल्यानंतर शेतकरी घराकडे निघाले होते. मात्र, शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भावनिक आवाहनानंतर शेतकऱ्यांची नव्या दमाची फौज सीमेवर येऊ लागली आहे. ऑक्टोबरपर्यंत सरकारने कृषी कायदे मागे घ्यावे या मागणीवर आंदोलक ठाम असून आंदोलनाच्या समर्थनार्थ शनिवारी देशव्यापी चक्का जाम करण्यात आला. तथिपी, शेतकरी आंदोलनाला अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी पाठिंबा दिला आहे. यात काही आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींचाही समावेश आहे.