नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करावे, यासाठी पंजाबच्या एका शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. "कृषीविषयक तीनही कायद्याविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे. हे तीनही कायदे रद्द करण्यासाठी आपण नरेंद्र मोदी यांची मनधरणी करावी," अशा आशयाचे पत्र हरप्रीत सिंग यांनी लिहिले आहे. हरप्रित सिंग हे पंजाबच्या फिरोजपूरमधील रहिवासी आहे.
काय म्हटलं पत्रात -
मी हे पत्र अत्यंत भावनिक होऊन लिहितो आहे. तीनही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी देशभरातील शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलनात ज्येष्ठ शेतकरी, महिला, लहान मुलांसह सहभागी आहेत. कडाक्याच्या थंडीत शेतकरी आजारी पडत असून आतापर्यंत काहीचा मृत्यू झाला आहे. हा विषय आमच्या सर्वांसाठी चिंतेचा आहे. कृषी कायदे हे अडानी, अंबनी आणि अन्य कॉर्पोरेट लोकांच्या इशाऱ्यावर पारित करण्यात आले आहेत. त्यामुळे या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर शांततापूर्वक आंदोलन सुरू आहे. मी हे पत्रा आशा आणि अपेक्षेने लिहत आहेत. तुमचे पुत्र नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. ते कृषी कायदे रद्द करू शकतात. आपल्या जन्मदात्या आईची विनंती, कुणीही अमान्य करू शकत नाही. फक्त एक आईच आपल्या मुलाला आदेश देऊ शकते. आपण जर मोदींची मनधरणी केली, हे कायदे रद्द झाले तर सारा देश आपल्याला धन्यवाद देईल, असे हरप्रीत सिंग यांनी पत्रात लिहिलं आहे.
शेतकऱ्यांची ट्रॅक्टर परेड -
जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी कृषी कायद्याविरूद्ध दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सरकार आणि शेतकरी यांच्यात आतापर्यंत 11 फेऱ्या झाल्या आहेत. परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. सरकार किंवा शेतकरी दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. दरम्यान, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेडची तयारी सुरू केली आहे. पंजाबमधील खेड्या-पाड्यातून लोक ट्रक्टर रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत. पुरुषांबरोबर महिलादेखील या परेडमध्ये सहभागी होणार आहेत.