न्यूयॉर्क : 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान एका पॉर्न अभिनेत्रीला गुपचूप पैसे दिल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. त्यांचा त्रास कमी होताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात मॅनहॅटन ग्रँड ज्युरीने आरोप लावल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आज मॅनहॅटन न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गुन्हेगारी आरोपाचा सामना करणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. यासोबतच 2024 मध्ये पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये जाण्याचे त्यांचे स्वप्न भंग पावताना दिसत आहे.
रिसॉर्टमध्ये परतण्याची त्यांची योजना : त्यांच्या कार्यालयाने रविवारी सांगितले होते की, 76 वर्षीय ट्रम्प सोमवारी त्यांच्या मार-ए-लागो घरातून न्यूयॉर्क सिटीला जाण्याची अपेक्षा आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर फ्लोरिडा येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये परतण्याची त्यांची योजना आहे, तेथे ते मंगळवारी रात्री समर्थकांना संबोधित करतील. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले की, मी सोमवारी दुपारी १२ वाजता मार-ए-लागो येथून निघून न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरवर जाणार आहे. मंगळवारी सकाळी मी कोर्टात जात आहे.
सुनावणी दरम्यान आरोपांचे वाचन : माजी राष्ट्रपतींवर आरोपाच्या पार्श्वभूमीवर शहरात समर्थक आणि निदर्शकांकडून निदर्शने अपेक्षित आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी केली आहे. गुन्हेगारी आरोपांचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष आहेत. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. कार्यवाही थोडक्यात अपेक्षित आहे. सुनावणी दरम्यान आरोपांचे वाचन केले जाणार आहे. ही प्रक्रिया सुमारे 10-15 मिनिटे चालणार आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील मोठा राजकीय छळ : पॉर्न स्टारला गुपचूप पैसे देण्याच्या भूमिकेबद्दल मॅनहॅटनमधील एका ज्युरीने ट्रम्प यांच्यावर आरोप ठेवण्यासाठी मतदान केले होते. या प्रकरणी ट्रम्प यांना आत्मसमर्पण करण्यास आणि आरोपांना सामोरे जाण्यास सांगण्यात आले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, हा अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा राजकीय छळ आहे.