मिर्झापूर - प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे त्याची मेहनत आणि परिश्रम दडलेले असते, जे त्याला काळाबरोबर जगायला शिकवते. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, जो खेडे गावातील शेतात शेळ्या चारून अभ्यास करत आयएएस झाला. सध्या हा IAS सोशल मीडियावर केलेल्या भावनिक पोस्टमुळे खूप चर्चेत आहे. या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या लहानपणाचा एक किस्सा शेअर केला, जो वाचून लोक भावूक झाले. त्याच्या या ट्विटनंतर अनेक यूजर्सनी त्याचे कौतुकही केले. राम प्रकाश (IAS Ram Prakash) असे त्या IAS अधिकाऱ्याचे नाव आहे. तो 2018 मध्ये सहाव्या प्रयत्नात IAS परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरला होता.
राम प्रकाश यांनी सांगितले लहानपणीचे किस्से - राम प्रकाश यांचे सुरुवातीचे शिक्षण वाराणसीतून झाले. आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना ते लिहितात की, जून २००३ मध्ये आम्ही ५-६ जण शेळ्या चरायला गेलो होतो. तिथे एका आंब्याच्या झाडाच्या फांदीवर आम्ही झोका खेळत होतो. त्यावेळी अचानक फांदी तुटली. पण कोणालाही दुखापत झाली नाही. आम्ही झाडाची अनेक फांद्या एकत्र आणल्या होत्या, त्यामुळे ही फांदी तुटली असल्याचे समोर आले होते, असे ते पोस्टमध्ये सांगतात.
शेळ्या चारत केला अभ्यास - मूळचे मिर्झापूरमधील जमुआ बाजारचे रहिवासी असलेले आयएएस राम प्रकाश त्यांच्या ट्विटमध्ये पुढे लिहितात की, अभ्यासानंतर अनेकदा शेळ्या चरायला जाणे देखील त्यांच्या दिनक्रमात होते. गावात शाळा सुटल्यावर ते रोज शेळ्या चरायला जायचे, कारण घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे अभ्यास आणि शेळीपालन दोन्ही काम एकत्रच करावे लागायचे, असे ते सांगतात.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत - राम प्रकाश हे राजस्थान केडरचे 2018 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण श्रद्धानंद सरस्वती इंटरमिजिएट कॉलेज, रोहनिया, वाराणसी येथून घेतले. त्यानंतर 2007 मध्ये ते 12वी उत्तीर्ण झाले. सध्या ते राजस्थानमधील पाली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे सहाव्या प्रयत्नात त्यांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावेळी त्यांनी 162 रँक मिळाली होती. तसेच 2025 पैकी 1041 गुण त्यांना मिळाले होते. तसेच त्यांनी झालावारच्या भवानी मंडी आणि अजमेरच्या ब्यावरच्या उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभारही सांभाळला होता. आयएएस राम प्रकाश यांचे ट्विटरवर 65 हजार फॉलोअर्स आहेत.