पूर्व चंपारण, मोतिहारी (बिहार) - बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील तुर्कौलिया पोलीस स्टेशन परिसरात एका पिसाळलेल्या हत्तीने गोंधळ घातला. तुर्कौलिया येथील पिपरिया पेट्रोल पंपाजवळील दलित वस्तीसह विविध भागात हत्तीने गोंधळ घातला. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरली होती. सकाळी तुर्कौलिया पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने हत्तीला दोरीने बांधून ताब्यात घेण्यात आले.
एकाचा मृत्यू झाल्याची माहिती - सरियतपूर येथील अनिल ठाकूर यांचा हत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. हत्तीला नियंत्रित करणारा महावत हा हत्ती घेऊन तुर्कौलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्याच्या घरी आला. मात्र काल रात्री उशिरा हत्ती अचानक अनियंत्रित झाला. त्यानंतर तुरकौलियाच्या पिपरिया दलित वस्तीसह आसपासच्या परिसरात हत्तीने तांडव करणे सुरू केले. हत्तीने गोंधळ घातल्याचे पाहून लोक आवाज करू लागले. त्यानंतर हत्ती भडकला आणि त्याने नुकसान करण्यास सुरू केले. यात महावत गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
लोकांनी रात्र काढली बाहेर - लोकांना घरे सोडून बाहेर रात्र काढावी लागली. हत्तीने कहर केल्याची माहिती स्थानिक लोकांनी वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना दिली. माहिती मिळताच दाखल झालेल्या तुर्कौलिया पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने हत्तीवर नियंत्रण मिळवले. हत्तीला लोखंडी साखळ्यांनी आणि जाड दोरीने बांधले होते. त्यानंतर पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.