बंगळुरू - कर्नाटकाच्या गुलबर्गामध्ये रविवारी भूकंपाचे झटके बसले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याची पुष्टी केली आहे. सकाळी सहा वाजता गुलबर्गा शहराला भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तिव्रता 3.4 नोंदविण्यात आली. भूकंपामुळे किती नुकसान झाले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते.
भूकंप कसा मोजला जातो -
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी सिस्मोमीटरचा वापर केला जातो. हे यंत्र जमिनीच्या पृष्ठभागावर ठेवले जाते. यंत्रामध्ये जमिनीच्या कंपनाची व केंद्राची नोंद होते. आलेखाच्या माध्यमातून भूकंप माहिती होतो. याबरोबर तीव्रता समण्यासाठी रिश्टर स्केलचा वापर केला जातो. त्यामुळे भूकंपाच्या नुकसानीचा अंदाज रिश्टर स्केलवरून समजण्यास मदत मिळते.
भूंकप झाल्यास काय करावे -
- इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
- भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
- मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
- घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
- उंचावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा.
हेही वाचा - पाकिस्तानमध्ये 6.0 रिश्टरस्केल तीव्रतेचा भीषण भूकंप, 20 जण ठार, 200 पेक्षा जास्त जखमी