नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असून आज आंदोलनाचा सतरावा दिवस आहे. कायदे रद्द व्हावे, या मागणीसाठी शेतकरी सीमेवर पाय रोवून उभे आहेत. कृषी कायद्यांवरून हरयाणा सरकार अडचणीमध्ये आले आहे. कृषी कायदे मागे घ्यावे, नाहीतर राजीनामा देईल, अशी भूमिका जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी घेतली. त्यावर आज चौटाला यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात दुष्यंत चौटाला गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. राज्यातील भाजपा सरकारला दिलेला पाठिंबा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आजची भेट म्हत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्यांच्या भेटीचे छायाचित्र संरक्षण मंत्रालयाच्या टि्वटर खात्यावरून टि्वट करण्यात आले आहे. दोघांमध्ये काय चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नाही.
काय म्हणणे आहे दुष्यंत चौटालांचे?
एमएसपी (किमान आधारभूत किंमत) ही शेतकऱ्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मला आशा आहे, की सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल. शेतकरी आंदोलन मागे घेतील. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. हे करण्यास आम्ही अक्षम ठरल्यास राजीनामा देण्यास तयार आहे, असे चौटाला म्हणाले होते.
पक्षनिहाय संख्याबळ -
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना बहुमत न मिळाल्याने राज्यामध्ये त्रिशंकू परस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा जननायक जनता पक्षाने भाजपला पाठिंबा दिला होता. भाजपला स्वत:चे 40 उमेदवार, 10 जेजेपी आणि सात अपक्ष, एकूण 57 आमदारांचा पाठिंबा आहे. हरयाणामध्ये 90 सदस्यांच्या विधानसभेत भाजपने 40 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसने 31 जागा जिंकल्या असून जननायक जनता पार्टीने 10 जागा जिंकल्या आहेत. याचबरोबर 7 अपक्ष उमेदवारांनीही विजयाची नोंद केली आहे.
हेही वाचा - हरयाणातील भाजपा सरकार अडचणीत?, दुष्यंत चौटालांचा राजीनाम्याचा इशारा