हैदराबाद : डीआरडीओने तयार केलेल्या कोविड-१९वरील औषधाच्या किंमती ठरवण्यात आल्या आहेत. २डीजी या औषधासाठी खासगी कंपन्यांनाकडून वेगळे, तर सरकारकडून वेगळे दर आकारण्यात येणार आहेत. खासगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारला ही लस स्वस्तात मिळणार असल्याचे डीआरडीओने स्पष्ट केले आहे.
सरकारने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, खासगी कंपनी रेड्डीज लॅब हे औषध ९९० रुपये प्रति पाऊच या दराने विकणार आहे. मात्र, सरकारी रुग्णालयांमध्ये हे औषध आणखी कमी किंमतीला उपलब्ध होऊ शकते.
औषध कोरोनावर प्रभावी..
एप्रिल २०२० मध्ये कोविड औषध निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण काम सुरू करण्यात आले होते. सीसीएमबी हैदराबादमध्ये याचा पहिला प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी) या औषधाचा विषाणुवर होणाऱ्या परिणामाबाबत माहिती मिळाली. हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे दिसून आले. त्यानंतर याची मानवी चाचणी करण्यात आली. तसेच, डीजीसीआयने या औषधाच्या वापराला परवानगीही दिली आहे. १७ मे रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या औषधाचे लॉंचिंग केले होते.