महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे (died on 6th December 1956) महापरिनिर्वाण (निधन) (Mahaparinirvana day) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.
प्रचंड प्रतिभेचे विद्यार्थी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय बहुपयोगी, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली. आणि अस्पृश्यांवरील (दलित) सामाजिक भेदभावाविरुद्ध मोहीम चालवली. त्यांनी कामगार, शेतकरी आणि महिलांच्या हक्कांनाही पाठिंबा दिला. आंबेडकर हे प्रचंड प्रतिभेचे विद्यार्थी होते. त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हींमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली आणि कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात संशोधन केले. त्यांचे सुरुवातीचे आणि नंतरचे आयुष्य राजकीय कार्यातच गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार आणि चर्चा, जर्नल्स प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क आणि सामाजिक स्वातंत्र्याची वकिली करणे यात सामील झाले आणि भारताच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.
चैत्यभूमी भेट : निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.
स्मृतीस्थळांना वंदन : 'महापरिनिर्वाण दिन' या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इत्यादी ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.