नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढावून घेतला आहे. शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना का वाईट वाटतं, असा वादग्रस्त विधान त्यांनी जातीव्यवस्थेबाबत केलं. तसेच क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत, असेही प्रज्ञा सिंह यांनी म्हटलं. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
प्राचिनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियला क्षत्रिय म्हटले तर त्यांना वाईट वाटत नाही, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटलं तर त्यांना ते वाईट वाटत नाही. वैश्यालाही वैश्या म्हणून संबोधल्यास तीला वाईट वाटत नाही. मग एखाद्या शूद्रला शुद्र म्हटल्यासं त्यांना वाईट वाटतं, याचे कारण काय. जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी केलं आहे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार. त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत, असे वक्तव्य त्यांनी केलं.
प्रज्ञांचा ममता बॅनर्जींवर निशाणा -
भाजपाचे राष्ट्रध्यक्ष यांच्या ताफ्यावर पश्चिम बंगालमध्ये दगडफेक झाली. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही प्रज्ञा सिंह यांनी टीका केली. राज्यात ममता यांची राजवट संपली आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव निश्चित असल्याने त्या निराश झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुका जिंकेल आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदु राज स्थापन होईल, असेही त्या म्हणाल्या.
तीन आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई -
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे बोलवण्यात आले आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी ही कारवाई केली.
गृहमंत्रालयाने अधिकाऱ्यांना दबावाखाली ठेवलं -
तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) गृह मंत्रालयाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गृहमंत्रालयावर पश्चिम बंगालच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना दहशतीत ठेवल्याचा आरोप केला. अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्यावर दबाव आणणे ही गृहमंत्रालयाची रणनीती आहे. असे केल्याने राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे, असे कल्याण बॅनर्जी म्हणाले.
हेही वाचा - ऑपरेशन थिएटरमध्ये 'ती' वाजवत राहिली पियानो, अन् डॉक्टरांनी केली मेंदूची सर्जरी