कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे. पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली आहे. दोन्ही नेते कार्यकर्त्यांना भेटण्यास जात असताना ताफ्यातील गाड्यांवर हल्ला झाला. जे. पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर तुफान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. नड्डांच्या बंगाल दौऱ्यात पोलिसांनी सुरक्षेबाबत हलगर्जीपणा केल्याचा आरोपही घोष यांनी केला आहे.
गृहमंत्र्यांना लिहले पत्र
जे. पी नड्डा यांच्या बंगाल दौऱ्यातील सुरक्षाव्यवस्थेवरून बंगालचे भाजपा प्रमुख दिलीप घोष यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले आहे. नड्डा यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था पुरेशी नव्हती. त्यांच्या कार्यक्रमावेळीही पोलीसांनी हलगर्जीपणा केला. काही कार्यक्रमात तर सुरक्षा व्यवस्थाही नव्हती. पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत घोष यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहले आहे.
डायमंड हार्बरकडे जात असताना हल्ला
डायमंड हार्बर येथे जात असताना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता अडवला आणि नड्डा यांच्या गाडीवर आणि ताफ्यातील इतर गाड्यांवर दगडफेक केली. यातून टीएमसीची मानसिकता दिसून येते, असे बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष म्हणाले. दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत गाड्यांना सुखरूप जाण्यास रस्ता करून दिली.
ममतांच्या सत्ताकाळात बंगालमध्ये अराजकता
जे. पी नड्डा दोन दिवसीय पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आले असून दुसऱ्या दिवशी २४ परगना जिल्ह्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, आज इथे येत असताना रस्त्यात मी जे दृश्य पाहिले, त्यातून असं दिसतं की, ममता बॅनर्जी यांच्या सत्ताकाळात बंगामध्ये अराजकता आणि असहिष्णूता पसरली आहे. दुर्गामातेच्या आशीर्वादामुळे मी आज इथे पोहचू शकलो. टीएमसीच्या गुंडांनी लोकशाहीचा गळा घोटण्यात कोणतीही कमी ठेवली नाही, असे ते म्हणाले.