नवी दिल्ली - शाहदारा भागातील विक्रम सिंह कॉलोनीत सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर मोठी आग लागली होती. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रात्री उशिरा घडली.
घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले . आगीतून पाच जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. यातील एक व्यक्ती 25 टक्के भाजला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृताची ओळख मुन्नी देवी (45), नरेश (22), ओमप्रकाश (20), सुमन (18) अशी पटली आहे. तर जखमी झालेले लालचंद यांच्यावर उपचार सुरू आहेत.
तुगलकाबादच्या एक्सटेंशनमध्ये लागली होती आग -
शाहदरा भागाशिवाय दक्षिण-पूर्व दिल्लीतील तुगलकाबादच्या एक्सटेंशनमध्ये मंगळवारी सांयकाळी आग लागली होती. ही आग एका सिलेंडरच्या दुकानात लागली होती. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
आग लागलीच तर काय कराल?
आग लागण्याची शक्यता कुठेही नाकारता येत नाही. आग लागणे ही एक प्रकारची आपत्तीच आहे. आग मानव निर्मित किंवा नैसर्गिक असू शकते. आगीसारख्या आणीबाणीच्या वेळी अग्निशामक योग्य प्रकारे वापरणे गरजेचे आहे. पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीनं पाचारण करायला हवं. आगी संबधी कुठल्याच बाबतीत निष्काळजीपणा करू नये व मोठी जोखीम स्वीकारू नये.