नवी दिल्ली - राजधानीत बहुतांश रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असताना दिल्ली उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. जर कोणी ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आणत असेल तर त्याला फासावर लटकवा, असे संतप्त झालेल्या दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोरोनाबाधितांची वाढलेली संख्या म्हणजे त्सुनामी असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्लीतील काही रुग्णालयांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत ऑक्सिजनचा पुरवठा व्हावी, अशी याचिका दाखल केली आहे. जर दिल्लीत ४८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर यंत्रणा कोसळणार आहे. नवीन कोरोनाबाधितांची संख्या रोज वाढत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत असताना दिल्ली उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा-दिल्लीत ऑक्सिजन अभावी 21 रुग्णांचा मृत्यू, 200 रुग्णांची मृत्यूशी झुंज
केजरीवाल सरकारकडून केंद्राच्या प्रतिज्ञापत्राची मागणी-
जर ४८० मेट्रिक टन ऑक्सिनजचा पुरवठा झाला नाही तर व्यवस्था कोसळेल. गेल्या २४ तासात आम्ही पाहिले आहे. काहीतरी विनाशकारक घडेल, असे केजरीवाल सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले. केवळ २८७ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा काल झाला आहे. केंद्र सरकारने सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी मागणीही केजरीवाल सरकारने केली आहे. जर कोणी ऑक्सिजनचा पुरवठ्यात अडथळा आणत असेल तर त्या माणसाला फासावर लटकवा, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
हेही वाचा-दिल्ली ऑक्सिजन संकट : आपत्कालीन स्थितीसाठी सरकार ठेवणार राखीव ऑक्सिजन साठा
दिल्लीत उध्वस्त होत असलेल्या आरोग्य व्यवस्थेचे चित्र समोर येत आहे. येथील जयपूर गोल्डन रुग्णालयात ऑक्सिजन अभावी एकसाथ २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. उच्च न्यायालयाने दिल्लीतील आरोग्य व्यवस्थेवर चिंता व्यक्त करताना म्हटले आहे, की ही कोरोनाची लाट नसून सुनामी आहे. सरकारने उच्च न्यायालयात २१ मृत्यूंची माहिती दिली आहे.
२०० रुग्णांच्या जीवाला धोका -
रुग्णालय प्रशासनाने सांगितले, की सध्या रुग्णालयात २०० कोविड रुग्ण दाखल आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे. कारण रुग्णालयात केवळ अर्ध्या तासांचा ऑक्सिजन शिल्लक राहिला आहे. रुग्णालयाकडून डॉ. डीके बलूजा यांनी सांगितले, की ऑक्सिजनच्या अभावी शुक्रवारी रात्री २१ रुग्णांचा मृत्यू झाला. अजून २०० हून अधिक कोविड रुग्ण दाखल आहेत. रुग्णालयात केवळ ३० मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे.