नवी दिल्ली : जगतपुरी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी लग्नाच्या मिरवणुकीतून वराच्या गळ्यातील हार हिसकावून पळालेल्या चोरांना अटक केली आहे. हार हिसकावून पळणारे दोघेही चोर स्विगीचे डिलिव्हरी बॉय आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. गीता कॉलनीत राहणारे जसमीत सिंह आणि राजीव मेहतो अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दोघांनी मिळून केली चोरी : डीसीपी रोहित मीना यांनी सांगितले की, 31 जानेवारी रोजी जगतपुरी पोलिस स्टेशनला गीता कॉलनीतील स्टार प्लेसजवळ चोर वराचा हार चोरून फरार झाल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच जगतपुरी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे फिर्यादी अंकित गुप्ता यांनी सांगितले की, स्टार प्लेस येथे त्यांचा भाऊ अनु गुप्ता याचे लग्न होते. मिरवणूक स्टार प्लेसकडे जात होती, त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी वराकडून 500 रुपये किमतीचा हार हिसकावून घेतला. हाराला 10 हजार रुपयांच्या नोटा लावल्या होत्या. त्या तरुणाने हार घेऊन पळ काढला आणि स्कूटी घेऊन जवळच थांबलेल्या त्याच्या एका साथीदारासह स्कूटीवर बसून फरार झाला.
सीसीटीव्हीच्या मदतीने शोधले : तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपी ज्या मार्गाने पळून गेले त्या मार्गाची छाननी करण्यात आली. स्कूटीचा शोध घेण्यासाठी 80 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस गीता कॉलनीत पोहोचले आणि स्कूटी स्वार असलेल्या आरोपीला अटक केली. त्याचे नाव जसमीत सिंह आहे. त्याच्या सांगण्यावरून घटनेत वापरलेली स्कूटी जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडून 5500 रुपये जप्त करण्यात आले.
ड्रग्जच्या व्यसनामुळे केली चोरी : त्यानंतर आरोपी जसमीत सिंहच्या सांगण्यावरून त्याचा साथीदार राजीव मेहतो यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून 4500 रुपये जप्त करण्यात आले. दोन्ही आरोपींनी चौकशीदरम्यान सांगितले की, त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ते स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्या दोघांनाही ड्रग्जचे व्यसन आहे. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही चोरी केली.
हेही वाचा : Aurangabad Crime News: बंदुकीचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला लुटले; २७ लाख घेवून चोरटे झाले पसार