नवी दिल्ली - केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅली काढाण्यात आली होती. या आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आरोपी इक्बाल सिंग यांना जामीन मंजूर केला आहे. विशेष न्यायाधीश नीलोफर अबिदा परवीन यांनी इक्बाल सिंग यांना जामीन मंजूर केला.
दरम्यान जामीन मंजूर करताना न्यायालयाने अनेक अटी घातल्या आहेत. आरोपीला जामीन मंजूर करताना न्यायालयाने म्हटले आहे की, न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपी परदेशात जावू शकणार नाही, तसेच आरोपीला प्रत्येक सुनावणीला न्यायालयात हजर राहावे लागेल. जामीनावर सुटका झाल्यानंतर, या प्रकरणाचा तपास प्रभावीत होईल, अशी कोणीतीही कृती आरोपीने करू नये. दरम्यान इक्बालसिंग यांच्या वतीने वकिल जसप्रीत एस राय आणि जसदीप ढिल्लन यांनी न्यायालयात युक्तीवाद केला.
इक्बाल सिंग यांच्यावर नेमके काय आहेत आरोप?
केंद्र सरकारकडून तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या कायद्याला शेतकऱ्यांनी विरोध केला असून, हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. या कायद्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असताना, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसाचार उसळला होता. तसेच याचदरम्यान लाल किल्ल्यावर धार्मिक प्रतिके असलेला एका झेंडा देखील फडकवण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणात इक्बाल सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करण्यात आली होती. इक्बाल सिंग हे आंदोलन करत्या शेतकरी गटाचे संदस्य असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. आता या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा - विलगिकरण कक्षातून पळाले वीस पॉझिटिव्ह रुग्ण; घाटंजी येथील घटनेने खळबळ