नवी दिल्ली - दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने तिच्या नियमित जामीन अर्जासंदर्भात आज पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली. यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी न्यायालयाने जॅकलिनला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर केला होता.
जॅकलिनच्या वकिलाने सांगितले की, ती सतत तपासात सहकार्य करत आहे. तपास यंत्रणेने तीला जितक्या वेळा चौकशीसाठी बोलावले तितक्या वेळा तीने सहकार्य केले आहे. तपास यंत्रणांनी तीला अनेकवेळा दिल्लीत चौकशीसाठी बोलावले आहे. अशा स्थितीत न्यायालयाने सूचनांसह जॅकलिनला अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जॅकलिनला तपास यंत्रणेकडून चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा तिला हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 नोव्हेंबरला होणार आहे.
फोर्टिस हेल्थ केअरचे माजी प्रवर्तक शिवेंद्र मोहन सिंग यांची पत्नी आदित्य सिंग यांच्यासह अनेक हायप्रोफाईल लोकांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सुकेश चंद्रशेखरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली आहे. सुकेशच्या संपर्कात असल्याबद्दल अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचीही चौकशी सुरू आहे. जॅकलिनवर सुकेश चंद्रशेखरने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्याचा आरोप आहे.