नवी दिल्ली - प्रेमात धोका मिळाल्यानंतर अनेक जण टोकाचे पाऊल उचलतात. स्व:ता आत्महत्या करतात. नाहीतर समोरच्या व्यक्तीचे जीवन संपवतात. मात्र, दिल्लीच्या अबेंडकर नगरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. एक्सने प्रियसीच्या नव्या प्रियकराच्या मित्राचा खून केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दीपक असे आरोपीचे नाव असून कुणाल मृत व्यक्तीचे नाव आहे. तर योगी असे प्रियसीच्या नव्या प्रियकराचे नाव आहे.
दीपक नावाच्या युवकाचे गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, तीला दुसऱ्या योगी नामक तरुणावर प्रेम जडलं. तेव्हा दीपकने तीला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच योगी हा गुंड असल्याचे त्याने तीला सांगितले. आपल्याबद्दल दीपक तरुणीच्या मनात चूकीची माहिती भरवत असल्याने योगीने दीपकला मारहाण करण्याची योजना आखली. मात्र, याची माहिती मिळताच दीपक काही काळासाठी फरार झाला. मात्र, परतल्यानंतर प्रकरण आणखी शांत झाले नसल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
दीपक परत आल्याचे कळताच योगीने आपला मित्र कुणालच्या साथीने त्याचा शोध सुरू केला. कुणाल आपला शोध करत असल्याचे कळताच दीपकच्या रागाचा पारा चढला आणि कुणालला धडा शिकवण्याचा बेत त्याने आखला. मित्राच्या साथीने त्याने ऑनलाईन पोर्टलवरून चाकू मागवला. गेल्या 1 जूनला वडिलांच्या वाढदिवसाचा केक आणण्यासाठी कुणाल घराबाहेर पडला. तेव्हा दिपक आणि त्याच्या मित्रांनी चाकू खूपसून त्याला जखमी केला. या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कुणालला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टारांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.