कोलकाता (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मुख्यमंत्री आणि टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दुखापतीमुळे दीदी व्हिलचेअरवरून सभांना संबोधित करणार आहेत. आज दुपारी त्या हजारा येथे जाहीर सभांना संबोधित करतील. यासह तृणमूल काँग्रेसने निवडणूक जाहिरनाम्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
ममता बॅनर्जी कोलकातामधील मायो ते हाजरा रोडपर्यंत रॅली घेतील. त्यानंतर सांयकाळी दुर्गापूरमध्ये संबोधित करतील. तर उद्या 15 मार्चला पुरुलियावा भेट देतील. त्यांतर 16 मार्चला झारग्राम आणि 17 मार्चला बांकुरामध्ये सभा घेतील.
दीदींवर हल्ला -
10 मार्च रोजी नंदिग्रामच्या दौऱ्यावर असताना दीदी जखमी झाल्या होत्या. काही अज्ञात लोकांना धक्काबुक्की केल्याचे त्यांनी सांगितले होते. काही अज्ञात लोकांनी कारच्या दरवाजाला दणका दिला, ज्यामुळे मी जखमी झाले, असा दावा दीदींनी केला होता. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या डाव्या पायाला, कमरेला, खांद्याला आणि मानेला दुखापत झाल्या आहेत. नंदीग्राममध्ये जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने कोलकाताच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
टीएमसी-भाजपाचे आरोप-प्रत्यारोप -
दीदींवरील हल्ल्यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. तर भाजपाच्या एका शिष्टमंडळाने भारतीय निवडणूक आयोगाची भेट घेत, कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच हा हल्ला नौंटकी असल्याचे काही भाजपा नेत्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा - ताजमहाल हे 'शिवमंदिर', नाव बदलून 'राममहल' ठेवणार; सुरेंद्र सिंह यांचे वादग्रस्त विधान