कोटा - डोंगरीत दाऊदची ड्रग्ज फॅक्टरी सांभाळणारा ड्रग माफिया दानिश चिकना याला राजस्थान पोलिसांनी कोटामधून अटक केली आहे. मुंबई एनसीबीची टीम खूप दिवसांपासून दानिशच्या मागावर होती. आता मुंबईची एनसीबीची टीम आरोपीला घेण्यासाठी राजस्थानला रवाना झाली आहे. पोलिसांनी दानिश चिकनाच्या गाडीतून ड्रग्ज जप्त केले होते. गुरूवारी रात्री एनसीबीने राजस्थानमधील कोटामध्ये ही कारवाई केली.
दानिशच्या नावावर ६ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. दानिश मुंबईतील डोंगरी येथून फरार झाला होता. मुंबईत वास्तव्यास असणारा दानिश चिकना उर्फ दानिश फँंटम या नावाने अंडरवर्ल्डमध्ये प्रसिध्द आहे. त्याच्या नावावर मुंबईत सहा वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दानिश चिकना हा दाऊद इब्रहिम टोळीतील खास सदस्य मानला जातो. एनसीबी खूप दिवस त्याच्या मागावर होती. कारण दानिशकडे अमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे आहे. मुंबईत तो अनेक लोकांना अमली पदार्थ पुरवण्याचेही काम करत होता. त्याच्यासोबत एक मोठी टोळीही सक्रिय होती.
कसे पकडले चिकनाला
एनसीबीने तो कोटाला असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. या प्रकरणी कोटा पोलीस त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवून होती. त्यांनी हायवेवर नाकाबंदी केली होती. त्यातील एका गाडीत पोलिसांना मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आढळले. आरोपी दानिश चिकनाही गाडीत होता. तेव्हा, पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुंबई पोलीस कोटावरून त्याला प्रॉडक्शन वॉरंट जारी करून घेऊन जाऊ शकतात.