इंदौर- मध्य प्रदेशची राजधानी इंदौरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पगार न मिळाल्याने खाणीत काम करण्यास तरुणाने नकार दिला. काम करण्यास नकार दिल्याने या तरुणाला खदान व्यवस्थापकाकडून मारहाण करण्यात आली. आरोपीने या तरुणाची मान आपल्या पायाखाली दाबली, व तीथे उपस्थित असलेल्या इतर आरोपींनी देखील त्याला जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये आरोपी या तरुणाला मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. हा तरुण मला मारहाण करू नका अशी विनंती आरोपींना करत आहे. मात्र तरीदेखील हे आरोपी या तरुणाला मारहाण करत आहेत. या तरुणाला पट्ट्याने मारहाण करण्यात आली. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
बलाई समाजाकडून आंदोलन
दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच अखिल भारतीय बलाई समाज महासंघाच्या वतीने शनिवारी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, आरोपींना तात्काळ आटक करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
पगार न मिळाल्याने तरुणांनी काम केले होते बंद
पिडीत तरुण हा गीट्टी खदानीवर ट्रकचालक म्हणून काम करत होता. मात्र या खदान कामगारांचे अनेक महिन्यांचे वेतन रखडले होते. त्यामुळे या तरुणांनी खदानीवर काम करण्यास नकार दिला. तरुण कामावर येणार नसल्याचे जेव्हा खदान व्यवस्थापकाला कळाले, तेव्हा या खदान व्यवस्थापकाने संबंधित तरुणाला घटनास्थळी बोलावून मारहाण केली. या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. आरोपींनी केवळ या तरुणाला मारहाणच केली नाही, तर त्यांचा व्हिडिओ देखील बनावला. या व्हिडिओमध्ये आरोपी या तरुणाला निर्दयीपने मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे.
मारहाण प्रकरणी तिघांना अटक
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या व्हिडिओच्या आधारे तिघांना अटक केली आहे. मारहाण प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, या तरुणाला कामावर येत नसल्याने मारहाण करण्यात आली नाही, तर तो डिझेलची चोरी करताना पकडल्यामुळे मारहाण करण्यात आली. असा दावा अटक करण्यात आलेल्या आरोपींनी केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.