नवी दिल्ली : गुजरातच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर चक्रीवादळ बिपरजॉयची तीव्रता कमी झाली आहे. या चक्रीवादळामुळे देशातील हवामानात मोठा बदल झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणासह देशातील बहुतांश भागात पाऊस पडला. मुंबईसह राज्यातील अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. पण मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढलेले आहे.
आज पावसाची शक्यता : भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस होत आहे. वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार, दिल्लीत पुढील 2 ते 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्राच्या काही भागातही पाऊस हजेरी लावेल. आज मुंबई, कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. आज गुजरातच्या उत्तर भागाजवळील पूर्वोत्तर अरबी समुद्रात 55 ते 65 किमी प्रतितास ते 75 किलोमीटर प्रतितासाने वारे वाहू शकतात. दरम्यान, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भूज, कच्छमध्ये अनेक झाडे उन्मळून पडले आहेत. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पुढील दोन दिवस गुजरात आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
चक्रीवादळ डीप डिप्रेशनमध्ये कमकुवत: हवामान विभागाच्या मतानुसार, चक्रवादळ डीप डिप्रेशनमध्ये बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने शनिवारी ही माहिती दिली आहे. दक्षिण-पूर्व पाकिस्तानवरील चक्रीवादळ शुक्रवारी रात्री 11:30 वाजता 'डिप्रेशन' ते 'डीप डिप्रेशन' पर्यंत कमकुवत झाले आहे. चक्रीवादळ पुढील 12 तासात आग्नेय पाकिस्तान, लगतच्या नैऋत्य राजस्थान आणि धोलावीराच्या सुमारे 100 किमी ईशान्येस गेल्यानंतर अजून कमकुवत होईल.
बचाव कार्य : नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) टीमने रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांवरील पडलेल्या झाडांना हटवण्याची मोहीम सुरू केली आहे. हवामान विभागानुसार, चक्रीवादळ कच्छमधील जखाऊ बंदरापासून उत्तरेकडील 10 किमी अंतरावरील किनारपट्टीवर धडकले होते. याआधी शुक्रवारी सहा राष्ट्रीय आपत्ती रिस्पॉन्स दलाच्या पथकांनी रुपेन बंदरावरील सरकारी प्राथमिक विद्यालयातून 127 नागरिाकंना एनडीएच स्कूल द्वारका येथे नेण्यात आले. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांमध्ये 82 पुरुष, 27 महिला आणि 15 लहान मुलांचा समावेश आहे.
विज कंपनी अॅक्शन मोडमध्ये : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, चक्रीवादळ प्रवण भागात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने शुक्रवारी आणखी काही गाड्या रद्द केल्या होत्या. शुक्रवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी चक्रीवादळ बिपरजॉय संदर्भात गांधीनगर येथील स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये बैठक घेतली. नुकसानीचे आढावा घेण्यासाठी त्यांनी बाधित भागातील जिल्हाधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात जोरदार वारे आणि बिपरजॉय चक्रीवादळाच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, PGVCL (पश्चिम गुजरात विज कंपनी लिमिटेड) ची टीम शुक्रवारी अॅक्शन मोडमध्ये येत कामाला लागली आहे. नुकसान झालेल्या मालमत्तेपैकी 414 फीडर, 221 विद्युत खांब आणि एक टीसी त्वरित कार्यान्वित करण्यात आले. जामनगर जिल्ह्यातील ३६७ गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी एक अपडेट देताना एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल म्हणाले की, बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातला धडकल्यानंतर कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही.
हेही वाचा -
- Cyclone Biparjoy : बिपरजॉय वादळामुळे गुजरात राजस्थानमध्ये अतोनात नुकसान, NDRF ने वाचवले अनेकांचे जीव
- Cyclon Biparjoy: बिपरजॉय चक्रीवादळ सरकले राजस्थानकडे; पश्चिम राजस्थानला हाय अलर्ट, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- Cyclone Biparjoy: बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार; दोन नागरिकांसह 23 जनावरांचा मृत्यू , 940 गावांमध्ये अंधार, 22 जण जखमी