हैदराबाद - कोरोनावर भारत बायोटेकने लस तयार केली आहे. ही लस कोरोनावर प्रभावी ठरली आहे. याचे परिणाम देखील दिलासादायक आहेत. ही बाब पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या चाचणीच्या निष्कर्षांमधून समोर आली आहे.
कोवॅक्सिन विकसित करणार्या हैदराबाद स्थित कंपनीने पुण्यातील आयसीएमआर संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या सहकार्याने नुकतेच तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात केली आहे. पण या चाचणीसाठी स्वयंसेवकांची नोंदणी अद्याप घेण्यात आलेली नाही. दरम्यान, पुढील वर्षी कोरोनाच्या लसीकरणाला सुरूवात केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला लसीकरणाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यात लसीचे साठवणूक तसेच लसीकरणाबाबचा आराखडा तयार करण्याचे निर्देश आहेत.
दिल्ली -
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. दिल्ली सरकारने कोरोना काळात जे काही काम केले आहे, याची चर्चा यूपीच्या गल्लीबोळात होत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे अदित्यनाथ यांनी यूपीमध्ये सर्वाधिक कोरोना चाचणी घेण्यात आल्या असल्याचा दावा केला आहे. यात त्यांनी यूपीमधील कोरोना पॉझिटिव्ह दर आणि मृत्यू दर कमी असल्याचं सांगितलं आहे.
महाराष्ट्र -
मुंबई - केंद्र सरकारने कोरोना लस नागरिकांसाठी मोफत दिली पाहिजे, असे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केले आहे. यासोबत त्यांनी केंद्र सरकारने जर लस मोफत दिली नाही तर आम्ही राज्यात ही लस मोफत देण्याबाबत विचार करू, असे देखील टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात मागील 24 तासांत नव्या 4 हजार 304 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी 95 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 61 हजार 454 पर्यंत खाली आली आहे. तसेच आज 4 हजार 678 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत 48 हजार 434 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकूण 17 लाख 69 हजार 897 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनाचा रिकव्हरी रेट 94.01 टक्क्यांवर पोहचला आहे. याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली.
तमिळनाडू -
चेन्नई - तामिळनाडू सरकारने बुधवार (ता. 19) पासून मोकळ्या जागेत राजकीय व धार्मिक मेळाव्यास परवानगी दिली आहे. पण यासाठी त्यांनी काही निर्बंध जाहीर केले आहेत.
मुख्यमंत्री एडप्पाडी के पलानीस्वामी यांनी एका निवदनाद्वारे म्हटलं आहे की, सामाजिक, राजकीय, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, करमणूक आणि धार्मिक मेळाव्यास मोकळ्या जागेत, जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने घेण्यास परवानगी देण्यात येईल. पण यासाठी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागेल.
मध्य प्रदेश -
भोपाळ - नऊ महिन्यापेक्षा जास्त काळानंतर मध्य प्रदेशमध्ये ९ ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कॉलेज उघडण्यात येणार आहेत. यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्यातील शासकीय शाळा यात १० वी १२ वी या तुकड्या १८ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. तर ९ वी आणि ११ वी बाबतचा निर्णय सरकारने शाळा व्यवस्थापनाकडे सोपवला आहे.