हैदराबाद- भारत बायोटेकने विकसित केलेल्या 'कोव्हॅक्सिन' या लसीची फेज-3 चाचणी सुरू झाल्याची माहिती भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी सोमवारी दिली. इंडियन स्कूल ऑफ बिझिनेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. तसेच भारत बायोटेक आणखी एक लसीवर काम करीत असून ती पुढच्या वर्षीपर्यंत तयार होईल, असेही ते म्हणाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या सहकार्याने भारत बायोटेक यांनी 'कोव्हॅक्सिन' ही लस विकसित केली आहे.
नवी दिल्ली- कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली, तरी दिल्लीत लॉकडाउन होणार नाही, असे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी म्हटले आहे. तसेच मास्क घालणे आणि कोविड संबंधीत नियमांचे पालन करणे बंधनकारक असून मास्क न घालणाऱ्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
महाराष्ट्र - मार्चमध्ये लॉकडाउन झाल्यानंतर महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे बंद होती. ती सोमवारपासून पुन्हा उघडण्यात आली आहे. तसेच मोबाइल फोन अॅप्लिकेशनद्वारे दररोज केवळ एक हजार भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आदर्श बांदेकर यांनी सांगितले.
हरियाणा - हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचाराकरीता पंजाबमधील मोहाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ८१ वर्षीय राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना आयसीयूमध्ये दाखल केले असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ट्वीटद्वारे आर्य यांना लवकर बरे होण्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
झारखंड- झारखंड सरकारने कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर नद्यांच्या तसेच तलावाच्या काठावर होणाऱ्या धार्मिक सोहळ्यांवर बंदी घातली आहे. तशी अधिसूचना झारखंड सरकारने जारी केली आहे. साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सरकारकडून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून कोणालाही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.
केरळ- मास्क घालून तसेच कोविड -19 च्या नियमांचे पालन करून भाविकांनी पवित्र सबरीमाला टेकडीवर जाऊन भगवान अयप्पांचे दर्शन घेतले. सोमवारी दोन महिन्यांच्या मंडळा-मकरविलाक्कू मोसमात हे मंदिर उघडले गेले आहे. या वर्षातला पवित्र सबरीमाला टेकडीवरचा हा पहिलाच धार्मिक उत्सव आहे.
गुजरात - दिवाळीच्या दिवसांमध्ये कोविड-19 च्या रूग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने गुजरातमधील रूग्णालयांवर ताण आला आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकार आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच खासगी रुग्णालयांमधील 90 टक्क्यांहून अधिक बेड भरले असून सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्येही नवीन रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा- मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिर खुले; भाविकांची गर्दी