नवी दिल्ली - सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र, नव्याने सापडलेल्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्यप्रदेशात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. अशातच दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात तयार झालेली भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन ही लस कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटवर प्रभावी आहे, अशी माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने दिली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Delta Plus Variant : 'डेल्टा प्लस'वर लस प्रभावी? सात दिवसात येणार निष्कर्ष
- एनआयएचकडून कोव्हॅक्सीन लसीचा अभ्यास -
नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थने या लशीचा अभ्यास केला. त्यामध्ये कोव्हॅक्सीन घेतलेल्या व्यक्तींचे रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यानुसार अल्फा आणि डेल्टा या दोन्ही व्हेरियंटविरोधात काम करणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्याचे यात आढळून आले. त्यामुळे ही लस प्रभावी असल्याचे सिद्ध झाले, असा दावा या संस्थेने केला आहे. या व्हेरियंटचे रुग्ण हे प्रथम ब्रिटन आणि भारतात सापडले आहेत.
- कोरोना व्हेरियंटविरोधात अँटीबॉडी तयार करते कोव्हॅक्सीन लस - NIH
अमेरिकन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ़ हेल्थच्या आर्थिक मदतीतून भारत बायोटेकने प्रभावी कोव्हॅक्सीन लस यशस्वीरित्या तयार केली आहे. ही लस भारतासह इतर देशांमधील जवळपास 2 कोटी 50 लाख नागरिकांना देण्यात आली आहे, असे एनआयएचने सांगितले आहे. कोव्हॅक्सीन लसीमध्ये सार्स-सीओवी-2 चे काही प्रमाणात अंश घेण्यात आले आहेत. हे अंश कोरोना व्हायरसविरोधात अँटीबॉडी तयार करण्यास मदत करतात, अशी माहिती एनआयएचने दिली आहे.
- २ लाख ५८ हजार लोकांवर ट्रायल -
लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेली फेज २ ट्रायलची माहितीचा आधार घेत त्यांनी ही लस अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. तसेच अद्याप प्रकाशित न झालेल्या अहवालाचाही यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. २ लाख ५८ हजार लोकांवर याची ट्रायल घेण्यात आली. यामध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींवर कोव्हॅक्सीन लस ७८ टक्के प्रभावी आहे, गंभीर कोरोनाविरोधात १०० टक्के, तर लक्षणे नसणाऱ्या कोरोनाविरोधात ७० टक्के प्रभावी असल्याचे एनआयएचने म्हटले आहे.
हेही वाचा - रुग्णाला अशा पद्धतीने मिळते 'डेल्टा प्लस व्हेरियंट'ची लागण झाल्याची माहिती